राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन तो सुखी होणार नाही. तो समृद्ध झाला पाहिजे. याकरिता योजना राबवीत आहोत. या योजना यशस्वी होऊन शेतकऱ्यावर कर्जमाफीची वेळ येणार नाही. यासाठी विठ्ठला, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चांगली बुद्धी दे, शेतकरी समृद्ध होऊ दे, असे साकडे घातल्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे सपत्नीक रविवारी पंढरपूर येथे आले होते. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू आहे. विरोधक श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत का, असे केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्हीच देणार. सेनेने सत्ता सोडण्याची तयारी दाखवली होती. आता विरोधक याचे श्रेय घेण्याचा प्रत्यन करणारच असे ते म्हणाले. पुढे बोलताना पेट्रोलचे दर वाढविणे हे राज्य सरकारला क्रमप्राप्त होते. दारू विक्रीवर र्निबध आल्याने महसुलात तूट निर्माण झाली होती. ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने इतर कर न वाढविता पेट्रोलवरील कर वाढविल्याचे केसरकर यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे सपत्नीक विठ्ठलाच्या दर्शनास आले होते. दर्शन झाल्यावर त्यांचा मंदिर समितीतर्फे सत्कार करण्यात आला. पंढरपूर येथील दर्शन झाल्यानंतर गृहराज्यमंत्री हे सोलापूर मुक्कामी जाणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूर आणि अक्कलकोट येथे दर्शन घेऊन पुढे मुंबईला जाणार आहेत.

राणेंना माध्यमांनी मोठे केले

नारायण राणे यांचे राजकारणातील स्थान कमी आहे. पण मीडियाने राणे यांना मोठे केले. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्णातील ८ पंचायत समितींपकी ५ माझयाकडे आहेत तर गेल्या २० वर्षांत जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मी अवघ्या २ वर्षांत केला आहे. कोकणातील रस्त्यासाठी केंद्राकडून १४०० कोटी मंजूर करून आणले. त्यामुळे राणे यांचे राजकीय स्थान याबाबत शोध पत्रकारिता करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.