सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पोलिसांनी स्वत:च्या घरासाठी मोहीम हाती घ्यावी, त्यांना स्थानिक  बँकेच्या मार्फत घर घेण्यास प्राधान्य देणारी योजना मंजूर करण्यात आली असल्याची ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू मिळेल त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावरील कारवाईची अंमलबजावणी लवकरच येणार आहे. कर्तव्यदक्ष ९५ टक्के पोलीस असतात, पण ५ टक्के पोलिसांच्या चुकीमुळे सर्व बदनाम होतात त्यासाठी शंभर टक्के पोलीस चांगले वागतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचा शुभारंभ केल्यानंतर महिलांसाठी जागृती नावाच्या पुस्तक प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी राज्याचे गृह अर्थ नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते.

या वेळी आमदार नीलम गोऱ्हे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती रवींद्र मगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीपकुमार गेडाम, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, दयानंद गवस, पद्मा चव्हाण, सुमती गावडे, जानकी सावंत, आदी उपस्थित होते.

सावंतवाडी पोलीस ठाण्याची जशी इमारत चांगली आहे, तशीच सेवादेखील या ठिकाणाहून मिळायला हवी. गोवा राज्यातून अवैध दारू मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते तिच्यावर आळा घातला पाहिजे. कोपर्डी घटना, आंबोली दरीत कोसळलेले तरुण पाहता ती अवैध दारूची उदाहरणे आहेत. आंबोली कावळेसारमध्ये दोन तरुण कोसळले हा अपघात नव्हता तर त्यांनी दारूच्या नशेत जाणून बुजून केलेले कृत्य होते, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

दारूच्या नशेत करण्यात येणाऱ्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना त्रास दिला जाऊ नये, पण उघडय़ावर, सार्वजनिक ठिकाणी दारूचा धिंगाणा नको. त्यावर पोलिसांनी कारावई करावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

ते म्हणाले, सावंतवाडी माझी जन्मभूमी असून, राजकीय कारकीर्द येथूनच सुरू झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंदे बंद करावेत. दारूच्या गोळा होणाऱ्या बाटल्या लक्षात घेता शून्यावर यायला हवे तरच अभिमानाने सांगता येईल, असे गृह राज्यमंत्री म्हणाले.

सिंधुदुर्गात महिला गुन्हेगारी कमी आहे. सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखला जातो. अवैध दारू धंद्यावर कारवाई करताना महिला संरक्षण व सुरक्षितता निर्माण होईल, असे पोलिसांनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करून आमदार नीलम गोऱ्हे यांच्या कामाचे कौतुक केले.

राज्यात पोलिसांना शासन प्राथमिकदृष्टय़ा १ लाख घरे देण्याची मुख्यमंत्र्यांनी योजना हाती घेतली आहे. सिंधुदुर्गातील पोलिसांनी नवीन घर खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जागृती पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी आम. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, दिल्लीच्या निर्भया केसनंतर देशभरात महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत, पण सिंधुदुर्गात हे प्रमाण कमी आहे. स्त्रीभ्रूण हत्या कमी होत्या, तसेच मुलीचा जन्मदरदेखील उत्तम असल्याचे त्यांनी सांगून महिलांसोबतच पुरुषांतदेखील जागृती व्हायला हवी असे सांगत जागृती पुस्तकाचे कौतुक केले.

यावेळी पोलीस अधीक्षक दिलीपकुमार गेडाम म्हणाले, सावंतवाडी पोलीस ठाण्याची इमारत १८९९ ची आहे. आता ११७ वर्षांनंतर नवीन इमारत मिळाली. महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगून अवैध धंदे निदर्शनास आणा कारवाई करतो, असे आवाहन केले.