२३ मार्चपासून साम्राज्यवादविरोध सप्ताह, जिल्हाभर पत्रके

दिल्ली विद्यापीठातील प्रा. साईबाबासह पाच सहकाऱ्यांना न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेचा नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध केला आहे. या सर्वाची तात्काळ सुटका करावी, या मागणीसाठी नक्षलवाद्यांनी २९ मार्चला भारत बंद व शहीद भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २३ ते २९ मार्चपर्यंत साम्राज्यवादी विरोध सप्ताहाचे आवाहन केले आहे. तशी पत्रके भामरागड, एटापल्ली, छत्तीसगड व तेलंगणात सापडलेली आहेत.

गडचिरोली जिल्हा न्यायालयाने नुकतीच प्रा. साईबाबासह पाच सहकाऱ्यांना जन्मठेपेची, तर एकाला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. देशीविदेशी कॉर्पोरेट घराण्यांकडे जल-जंगल-जमीन सोपण्यिाचा राज्य व केंद्र सरकारचा घाट आहे, त्यामुळेच साईबाबाला जन्मठेप ठोठावली आहे. मात्र, या शिक्षेविरुध्द तीव्र आवाज उठवू. सोबतच जल-जंगल-जमीन-इज्जत व अधिकारांसाठी संघर्ष करा, ब्राम्हणीय हिंदूत्व फासीवादाविरोधात व्यापक लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष संयुक्त मोर्चाचे निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. जनयुध्दाला अधिक तीव्र करून ऑपरेशन ग्रीन हंटला हरविणार असल्याचेही यात म्हटले आहे. शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २३ ते २९ मार्चपर्यंत साम्राज्यवादी विरोध सप्ताह पाळणार असल्याचे सांगून २९ मार्चचा बंद यशस्वी करण्याचे  आवाहन केले आहे. जगदलपूर कारागृहातून हडताळ करणाऱ्या दोन हजार कैद्यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई, तसेच कारागृहातील जनवादी, मानवाधिकार आंदोलनकर्ते, विस्थापनविरोधी आंदोलन व क्रांतिकारी आंदोलनातील कार्यकर्त्यांना राजकीय कैद्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली आहे. निर्दोष मुक्त केल्यावरही नक्षलवादी कार्यकर्ता कॉ. निर्मला, कॉ. पद्मा, कॉ. गोपण्णा मरकाम यांना वारंवार खोटय़ा प्रकरणांमध्ये अडकवून त्यांच्या अटकेचा विरोध करा, कायदा डावलून शिक्षा देऊन अधिक काळ कारागृहात डांबण्याचा प्रकारही बंद करा, असाही उल्लेख या पत्रकांमध्ये आहे. नक्षलवादी कार्यकर्ता कॉ. मालती, कॉ. रैनु, कॉ. मधु व अन्यांसह सर्वसामांन्यांनाही कारागृहात डांबण्याचा विरोध करून त्यांची तात्काळ सुटका करा, अशीही मागणी लावून धरण्यात येणार आहे, असेही यात नमूद आहे. राजकीय जेलबंदींच्या सुटकेसाठी आंदोलन करणार असल्याचा इशाराही यातून देण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या भारत बंद व विरोधी सप्ताह बघता गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

जिल्हा पोलिस दलापुढे आव्हान

प्रा.साईबाबा, सूरजागड लोह उत्खनन व या जिल्ह्य़ातील अनागोंदी कारभाराविरोधात नक्षलवादी पुन्हा एकदा हिंसाचार घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जहाल नक्षलवादी कमांडर नर्मदाक्का व साईनाथ या संपूर्ण घटनाक्रमावर अतिशय बारीक लक्ष्य ठेवून असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काळ गडचिरोली जिल्हा पोलिस दलासाठी जबर आव्हानात्मक आहे.