विधानसभा निवडणुकांपूर्वी दुष्काळ जाहीर करा, या मागण्यांसाठी सर्वच नेते रस्त्यावर उतरले. सत्ताधारी, विरोधक असा भेद न बाळगता मराठवाडय़ातील नेत्यांनी दुष्काळ शब्दाभोवती पद्धतशीरपणे राजकारण पेरले. दिवसेंदिवस पाऊसही हुलकावणी देत असल्याने आर्थिक पॅकेजची मागणी वाढू लागली आहे. हे लक्षात येताच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांनी गुरुवारी थेट पंतप्रधानांची भेट घेतली. मराठवाडय़ासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, असे साकडे त्यांनी घातले.
नाशिकमध्ये पडलेल्या पावसामुळे जायकवाडीची स्थिती सुधारली. त्यामुळे औरंगाबाद व जालना या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसा मिटला असला, तरी ग्रामीण भागात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढतेच आहे. मराठवाडय़ात ७२५ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरवाडय़ात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे. शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांपर्यंत ही मागणी आज पोहोचवली. मराठवाडय़ात पेरणीपूर्वी ६५.७७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. अजूनही काही भागात पेरणी झालेली नाही. काही ठिकाणी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे स्थिती चिंताजनक बनल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याही होऊ लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने पाऊल उचलावे व मराठवाडय़ासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.