नेवासे तालुक्यातील राजेगाव येथील सामूहिक बलात्कार व हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची कलमे लावण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणातील पीडित महिलेशी व तिच्या पतीशी महासंघाच्या तसेच स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाच्या पथकाने संवाद साधला. या घटनेची पाश्र्वभूमी आणि घटनाक्रम समजून घेतला. रविवारी सकाळी गावातील घुले आणि शिरसाठ आडनावाच्या मोठय़ा जमावाने या कुटुंबाच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. पीडित महिलेच्या पतीच्या उजव्या पायाचे अनेक तुकडे करण्यात आले आहेत. त्यांची मोठी मुलगी वेळीच आडवी आल्याने डोक्यात कुऱ्हाड पडता पडता ते वाचले. त्याची तक्रार त्वरेने केल्यावर सोनई पोलिसांनी लगेचच संशयितांना अटक केली असती, तर त्याच दिवशी रात्री सामूहिक बलात्कार करण्याची आरोपींना संधीच मिळाली नसती. ही सामूहिक बलात्काराची घटना टळली असती. या प्रकरणास सोनई पोलीस ठाण्याचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे महासंघाने या निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे.
पीडित परिवाराला भीती व दहशत वाटत असल्यास काही काळासाठी स्नेहालय संस्थेत राहता येईल असे आवाहन स्नेहाधारने केले आहे. सामाजिक संस्थांचे एक प्रतिनिधी मंडळ उद्या (बुधवार) राजेगाव येथे भेट देणार आहे.
नेवासे तालुक्यातीलच सोनई येथील तिहेरी दलित हत्याकांड, खर्डा (जामखेड) येथील दलित युवकाची निर्घृण हत्या, जवखेडे (पाथर्डी) येथील तिहेरी दलित हत्याकांड आणि अलीकडेच वांबोरी (पाहुरी) येथे प्रेमप्रकरणातील तरुणाची त्याच्या वडिलांसह काढण्यात आलेली विवस्त्र धिंड अशा प्रकरणांनी नगर जिल्हय़ातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राजेगावच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने एक दशकापूर्वीच्या कोठेवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण सर्वाना झाली, असे या निवेदनात म्हटले आहे. शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे व अन्य सामाजिक संघटनांनाही महासंघाने या घटनेची माहिती दिली आहे.