मुस्लिमांविरुद्ध केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्याविरुद्ध ‘देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा’ गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी संविधान हक्क परिषदेने केली आहे.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांच्या नेतृत्वाखाली डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी यासंदर्भात गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वरीलप्रमाणे मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे, की तोगडिया यांनी गुजरातमध्ये बोलताना मुस्लिमांविरुद्ध अत्यंत प्रक्षोभक आणि निषेधार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजात काळजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यांच्यामध्ये याबाबत भीतीचे वातावरण आहे. तोगडिया यांनी यापूर्वीही अनेक वेळा मुस्लीम समाजाविरुद्ध अशीच वक्तव्ये केली असून ते दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
देशात सुमारे २२ ते २३ कोटी मुस्लीम लोक राहात असून घटनेने त्यांना भारतीय नागरिकत्वाचा पूर्ण अधिकार दिला आहे. राज्यघटनेनुसार त्यांना मिळालेले अधिकार अबाधित राहणे गरजेचे असून सरकारवरही ही जबाबदारी आहे. मुस्लिमांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तोगडिया यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. लाल निशाण पक्षाचे कॉ. अनंत लोखंडे, लोकाधिकार आंदोलनाचे अरुण जाधव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर टोकेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र सातुपते, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कॉ. जालिंदर घिगे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.