कोकण रेल्वेमार्गावरच गेल्या १८ वर्षांत रेल्वे प्रवाशांची बारा महिने अफाट गर्दी झालेली पाहायला मिळाली, अशा प्रकारची गर्दी अन्य कोणत्याही मार्गावर झालेली नाही याची नोंद कोकण रेल्वे प्रशासनाने घेऊन मुंबई-मडगाव-मुंबई मार्गावर दर तीन तासांनी एक गाडी सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी केली आहे. कोकण रेल्वे आणि प्रवासी अडचणींमुळे घेऊन डी. के. सावंत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर रेल्वे प्रशासनाने उत्तर दिले. कोकण रेल्वे प्रशासनाचे हे उत्तर कोकण रेल्वे व प्रवाशांवर अन्याय करणारे आहे, असे डी. के. सावंत यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी स्टेशनवर लिफ्ट व सावंतवाडी स्टेशनवर सामान वाहतुकीसाठी ढकल गाडय़ा ठेवल्या म्हणजे प्रवाशांचे प्रश्न सुटले म्हणता येणार नाही, अशा आशयाचे एक निवेदन डी. के. सावंत यांनी कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना लिहिले आहे.
टोल फ्री, ई-मेल, वेबसाइटचा, डाऊनलोडचा यापर रेल्वेतील प्रवासी मोठय़ा प्रमाणात करीत नाहीत. त्यांची संख्या नगण्य असून, स्थानिक रेल्वे स्टेशनवर फोन करूनच रेल्वेची चौकशी लोक करतात, असे डी. के. सावंत यांनी या निवेदनात नमूद करून कोकण रेल्वे प्रशासनाच्या तकलादू म्हणण्याला विरोध केला.
कोकण रेल्वे स्टेशन साफ करण्याचे अभियान राबविण्यापेक्षा ट्रेनमधील टॉयलेट प्रथम साफ करा. शक्य झाल्यास रत्नागिरी स्टेशनवर गाडी आल्यावर ट्रेनमधील टॉयलेट तपासल्यास वास्तव लक्षात येईल, असे डी. के. सावंत यांनी म्हटले आहे.
कोकण रेल्वेमार्गावर जादा गाडय़ा सोडताना, दोन महिने आधी वेळापत्रक जाहीर करावे, तसेच गाडय़ा रात्रौ १२ ते १ वा. सोडण्यापेक्षा प्रवाशांची सोय लक्षात घेणे आवश्यक आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी नेहमीच अनियमित असते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात त्यावर कोकण रेल्वे प्रशासनाने सुविधा निर्माण करून द्यावी, असे डी. के. सावंत यांनी म्हटले आहे. गरीब रथ ही आंतरक्षेत्रीय रेल्वे आहे. मग कोकण रेल्वेमार्गापुरती गैरसोयीने जाणारी गरीब रथ एर्नाकुलमच्या पुढे अक्षरश: रिकामी धावते, याचे रेकॉर्ड कोकण रेल्वेकडे आहे. ते तपासून कोकणातील प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.
रेल्वे गाडय़ांचे परिचालन नियम फक्त कोकण रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीसाठी निर्माण करण्यात आले आहेत काय? असे प्रश्न उपस्थित करून एका गाडीला तीन-तीन गाडय़ा केवळ ५०० कि. मी. प्रवासात ओव्हेरटेक करतात, असे प्रकार अन्य रेल्वेमार्गावर डबल ट्रॅक असूनही कोठे दिसत नाहीत, असे डी. के. सावंत यांनी म्हटले आहे.
कोकण रेल्वे व मध्य रेल्वे यांच्यात वाद- प्रतिवाद नाही म्हटले तरी १८ वर्षांत कोकणातील लाखो प्रवाशांनी त्याचा अनुभव घेतला आहे. सकाळी ७.१५ वाजता मांडवी गाडी सीएसटी स्थानकावरून सुटल्यानंतर रात्री १० वा.पर्यंत एकही कोकण रेल्वेमार्गावर जाणारी गाडी सीएसटी स्थानकावरून सुटत नाही. डाऊन कोकणकन्या, मांडवी गाडय़ा किती वेळा वेळापत्रकाप्रमाणे पोहोचल्या याचे उत्तर कोकण रेल्वेकडे असूनही प्रशासन लोकांची दिशाभूल करीत असल्याचे डी. के. सावंत यांनी म्हटले आहे.
गाडय़ांच्या परिचालनासाठी अधिक ट्रॅक उपलब्ध होण्याच्या प्रकारामुळे ९५ टक्क्य़ाहून अधिक वेळा गाडय़ा उशिरा पोहोचत असतील तर सुधारणा व्हावी. कोकण रेल्वेचे रेक भारतीय रेल्वेचे आहे. कोकण रेल्वेचा एकही रेक नाही. कोकणातील प्रवासी सूर्यास्तापूर्वी कोकणात पोहोचला पाहिजे, असेही डी. के. सावंत यांनी म्हटले आहे.