महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ विचारवंत, भाकपचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात सपत्नीक झालेल्या खुनीहल्ल्याचा सोलापुरात डाव्या लोकशाही आघाडीने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने करण्यात आली. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात प्रतिगामी शक्ती फोफावत असून नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जात असताना त्यातूनच कॉ. पानसरे दाम्पत्यावर भ्याड खुनी हल्ला झाल्याचे नमूद करीत, या घटनेचा माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी निषेध नोंदविला.
या आंदोलतान १५० पेक्षा जास्त स्त्री-पुरूष कार्यकर्ते सहभागी झाले होते. माकपचे सिध्दप्पा कलशेट्टी, एम. एच. शेख, माजी नगरसेवक व्यंककेश कोंगारी, मेजर युसूफ शेख, भाकपचे अ‍ॅड. रामभाऊ म्हेत्रस, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. गोविंद पाटील, जनता दलाचे (से.) चन्नप्पा सावळगी, विद्रोदी साहित्य चळवळीचे विष्णू गायकवाड, मौलाना आझाद विचार मंचचे हसीब नदाफ, सलीन नदाफ, इम्तियाज शेख आदींचा त्यात प्रामुख्याने सहभाग होता. पानसरे दाम्पत्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा शोध घ्या, या हल्ल्यामागे दडलेल्या प्रवृत्तीला जेरबंद करा आदी मागण्यांच्या घोषणा निदर्शकांनी दिल्या.
याप्रसंगी बोलताना आडम मास्तर म्हणाले, पुरोगामी चळवळीची बिजे जेथे रोवली गेली, फोफावली आणि विस्तारली, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच कॉ. पानसरे दाम्पत्यावर गोळीबार करून भ्याड हल्ला करण्यापर्यंत प्रतिगाम्यांची मजल गेली आहे. यापूर्वी पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अशाच प्रकारे क्रूर हत्या करण्यात आली असता त्यांचा मारेकरी अद्यापि सापडत  नाही. तसेच १९७० च्या सुमारास मुंबईत कम्युनिस्ट नेते, आमदार कृष्णा देसाई यांचीही अशाच पध्दतीने हत्या करण्यात आली होती. पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी शक्ती वाढत असताना या प्रतिगाम्यांनी विचाराने विचारांचा प्रतिकार करण्याऐवजी शारीरिक हल्ले करून माणसेच मारण्याचे सत्र सुरू केले आहे. शासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन निष्पक्षपणे व प्रामाणिकपणे तपास करून मारेकऱ्यांचा छडा लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अ‍ॅड. म्हेत्रस, कॉ. शेख, सावळगी आदींची भाषणे झाली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.