तुळजापूर तालुक्यात डेंग्यूचा फैलाव झाला असतानाही आरोग्य विभागाकडून कसल्याच प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी चिकुंद्रा येथे डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाला, तर तीन बालकांवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिकुंद्रा गावात एकाच कुटुंबातील गणेश उमेश गायकवाड, ज्ञानेश्वर सुरेश गायकवाड, जयश्री सुरेश गायकवाड व आर्थिक सुरेश गायकवाड या चार बालकांना सुरुवातीला थंडीताप आला. प्रथमोपचार केल्यानंतरही आजार बरा होत नसल्याने या बालकांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर या बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चारही बालकांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना गणेश उमेश गायकवाड याचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर, जयश्री व आर्थिक गायकवाड यांच्यावर सध्या सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेंग्यूने चिकुंद्रा गावात बालकाचा मृत्यू होऊनही आरोग्य विभागाने याबाबत कुठलीच गंभीर दखल घेतली नाही. आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने तत्काळ दखल घेऊन डेंग्यूला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातही प्राथमिक स्तरावर उपचार उपलब्ध करावेत, अशी मागणी होत आहे.