स्वेच्छेने रक्तदानाचे आवाहन

नगर शहरातील डेंग्यूसदृश्य साथीमुळे रुग्णांना आवश्यक असणाऱ्या प्लेटलेटस्ची (बिंबिका) कमतरताही भासू लागली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रुग्णांच्या जीवन रक्षणासाठी पुढाकार घेऊन स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन जनकल्याण रक्तपेढीचे कार्यवाह डॉ. दिलीप धनेश्वर यांनी केले आहे. शहरात रक्तपिशव्या संकलित होण्याचे प्रमाण मागणीपेक्षा कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

नगर शहरात जनकल्याण, जिल्हा सरकारी रुग्णालय, आनंदॠषी रुग्णालय, बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, अहमदनगर, अर्बन, अष्टविनायक या सहा रक्तपेढय़ा आहेत, यातील बहुतांशी ठिकाणी ही परिस्थिती असल्याचा दावाही त्यांनी केला.

शहरात निर्माण झालेल्या या समस्येच्या निराकरणासाठी अधिकाधिक रक्तदात्यांनी, गटांनी, तरुणांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही डॉ. धनेश्वर यांनी केले आहे. नगर शहरात दोन वर्षांपुर्वी डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, त्यावेळीही प्लेटलेटचा तुटवडा जाणवला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. रक्तदानानंतर केवळ पाच ते सहा तासांतच प्लेटलेटसाठी रक्तविघटन व इतर प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात, त्यानंतर प्लेटलेटच्या पिशव्यांची कालमर्यादा केवळ पाच दिवसांची असते. त्यानंतर त्याचा उपयोग केला नाही तर त्या नष्ट कराव्या लागतात. त्यामुळे मागणीनुसारच प्लेटलेटस् तयार केल्या जातात, परंतु रक्तदानाचेच प्रमाण कमी असल्यामुळे व कालमर्यादा असल्यामुळे प्लेटलेटसचा तुटवडा जाणवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवडय़ात प्लेटलेटची मागणी करणाऱ्या अनेक रुग्णांना तुटवडय़ामुळे परत पाठवण्याची वेळ आल्याकडेही डॉ. धनेश्वर यांनी लक्ष वेधले. या शिवाय रक्तपेढय़ांना खर्च पेलवण्यासाठी कमी प्रमाणात तयार करणे व त्या टिकवून ठेवणेही शक्य होत नाही. तांत्रिक बाबींमुळे आवश्यकतेनुसार पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या शहरांतून मागवणेही शक्य होत नाही, अशा अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले.

या समस्येवर मात करण्यासाठी अधिक संख्येने रक्तदान होण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी अधिकाधिक रक्तदान शिबिरे व्हावीत, नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. धनेश्वर यांनी केले.

डेंग्यूची साथ आटोक्यात आल्याचा दावा महापालिकेने दोन दिवसांपूर्वी केला होता, मात्र प्लेटलेटस्चा काही दिवसांपासून जाणवणारा तुटवडा कायम असल्याचे डॉ. धनेश्वर यांनी सांगितले.