महाड परिसरात डेंग्यूमुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसला, तरी डेंग्यूची दहशत मात्र कायम आहे. जवळपास प्रत्येक घरातील एक व्यक्ती तापसरीच्या साथीने आजारी असल्याने शहरात भीतीचे सावट आहे. जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा मात्र परिस्थिती नियंत्रणात असून काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे सांगत आहेत.
महाड शहरात अनेक जणांना तापसरीच्या साथीने ग्रासले आहे. तापासोबत डेंग्यूसदृश लक्षणेही दिसत असल्याने घबराटीचे वातावरण आहे. शहरातील १२ रुग्णांची रक्ततपासणी केली असता सात जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरात तापसरीसोबत अंगदुखी, डोकेदुखी, रक्तपेशी घट होणे यासारखी लक्षणे दिसून येत असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर उशिरा का होईना आरोग्य विभागाने शहरात डेग्यूसाथीचा प्रादुर्भाव झाल्याचे जाहीर केले आहे. शहरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरात चार धूरफवारणी यंत्रांच्या मदतीने फवारणी सुरू करण्यात आली आहे. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधण्यासाठी प्रत्येकी तीन जणांची २५ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून घराघरात जाऊन पाहाणी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक आठवडय़ाला कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाण्याची साठवण करू नका, केल्यास ते झाकून ठेवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान या डेग्यूसदृश साथीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि हिवताप निवारण अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहाणी केली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या सहसंचालकांनी महाड परिसराला भेट देऊन आढावा घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून सध्या काळजी करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. शहरात एकही मलेरियाचा रुग्ण आढळून आला नसल्याचे हिवताप सर्वेक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.
मात्र शहरात डेग्यूची साथ असून प्राथमिक तपासण्यांमध्ये शहरातील दीडशेहून अधिक रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून आली आहे. तरीही शहरात डेंग्यूची साथ नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात होता. यामुळे आरोग्य विभाग नागरिकांपासून आणि शासनापासून डेंग्यूचा फैलाव झाल्याचे जाणीवपूर्वक लपवत आहे की काय, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. लोकांचे जीव गेल्यावर आरोग्य यंत्रणेला जाग होणार का, असा संतप्त सवाल नागरिक करत होते. अखेर आरोग्य विभागाने गुरवारी महाड शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन साथीचा प्रादुर्भाव झाल्याचे जाहीर केले.
जानेवारी महिन्यापासून रायगड जिल्ह्य़ात वेळोवेळी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते २२ जुलदरम्यान जिल्ह्य़ात ३७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये पनवेल तालुक्यात सर्वाधिक २६ रुग्ण आढळून आले. त्याव्यतिरिक्त महाड तालुक्यात नऊ तसेच खालापूर व कर्जत तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
काय काळजी घ्याल?
साठवलेल्या पाण्यात डासांची पदास होते. हे लक्षात घेऊन नागरिकांनी आठवडय़ातून एक दिवस तरी पाण्याची भांडी रिकामी करावीत व स्वच्छ घासून पुसून घ्यावीत. साठवून ठेवावयाच्या पाण्यात टेमीफॉसचे द्रावण टाकावे. घरातील तसेच घराबाहेरील पाण्याच्या टाक्यांना झाकण घट्ट लावावे किंवा कपडय़ाने झाका. जुने टायर्स, नारळाच्या करवंटय़ा, फुटलेल्या बादल्या अशा पाणी साठून राहणाऱ्या वस्तू घराभोवती साठू देऊ नका. घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रीज यामधील पाणी दोन-तीन दिवसांनी काढा, ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी केले आहे.
डेंग्यूचा धोका
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतो. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
डेंग्यूची लक्षणे
लहान मुलांमध्ये मुख्यत सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठय़ा माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते. स्नायू आणि सांध्यांमधे वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलटय़ा, त्वचेवर व्रण उठणे

नागरिकांनी हे करावे..
* पाणी पंधरा मिनिटे उकळून व  गाळून प्यावे.
* स्वतसह परिसराची स्वच्छता राखावी.
* ताजे आणि गरम अन्नच खावे.
* दिवसातून किमान पाच लिटर पाणी प्यावे.
* सार्वजनिक ठिकाणी रुमाल, मास्क वापरावा.
* सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या, घरातील भांडी स्वच्छ ठेवा.
* डासांपासून स्वसंरक्षण करा.
* आठवडय़ातून एक दिवस कोरडा दिवस पाळा.

नागरिकांनी हे करू नये..
* कोणताही आजार अंगावर काढू नये.
* मच्छरांची उत्पत्ती रोखण्यास  सहकार्य करावे.
* सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
* घरातील रुग्णाला बाहेर जाऊ देऊ नये.
* दवाखान्यात सोबत लहान मुलांना नेऊ नये.
* रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
*  घरगुती उपचार टाळावेत.