नऊ जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले
म्हसळा तालुक्यातील आगरवाडा परिसरात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू झाल्याचे दिसून आले आहे. तापाची लक्षणे दिसून आलेल्या नऊ जणांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या सर्वाची प्रकृती स्थिर असली तरी या परिसरातील गावकऱ्यांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
महाडपाठोपाठ आता म्हसळा तालुक्यातील काही भागांत डेंग्यूची सदृश तापाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाल्याने त्यामुळे आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. सुरुवातीला ही तापसरीची साथ असल्याचे बोलले जात होते. मात्र आता यातील काही जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने अंगदुखी, डोकेदुखी, रक्तपेशीत घट होणे, उलटय़ा आणि अंगावर पुरळ उठणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. ही सर्व लक्षणे डेंग्यू या आजाराशी मिळतीजुळती असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. म्हसळा प्राथमिक केंद्राच्या हद्दीत आगरवाडा या गावात डेंग्यूसदृश तापाचे अनेक रुग्ण आढळून आले. प्राथमिक तपासणी केली असता त्यांतील नऊ जणांमध्ये डेंग्यूची सदृश लक्षणे दिसून आली होती. यानंतर या सर्वाना पुढील उपचारासाठी तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक वाटत होती. मात्र आता सर्व नऊ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी सांगितले.
दरम्यान खबरदारीची उपाययोजना म्हणून या परिसरात धूरफवारणी यंत्रांच्या मदतीने फवारणी सुरू करण्यात आली आहे. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधण्यासाठी प्रत्येकी तीन जणांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून घराघरात जाऊन पाहणी सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक आठवडय़ाला कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाण्याची साठवण करू नका, केल्यास ते झाकून ठेवा असे आवाहन केले जात आहे.
डेंग्यूचा धोका
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतो. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
डेंग्यूची लक्षणे
लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठय़ा माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते. स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलटय़ा, त्वचेवर व्रण उठणे.

नागरिकांनी हे करावे..
’ पाणी पंधरा मिनिटे उकळून व
गाळून प्यावे.
’ स्वत:सह परिसराची
स्वच्छता राखावी.
’ ताजे आणि गरम अन्नच खावे.
’ दिवसातून किमान पाच लिटर
पाणी प्यावे.
’ सार्वजनिक ठिकाणी रुमाल,
मास्क वापरावा.
’ सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या,
घरातील भांडी स्वच्छ ठेवा.
’ डासांपासून स्वसंरक्षण करा.
’ आठवडय़ातून एक दिवस कोरडा
दिवस पाळा.
नागरिकांनी हे करू नये..
’ कोणताही आजार अंगावर
काढू नये.
’ मच्छरांची उत्पत्ती रोखण्यास
सहकार्य करावे.
’ सभोवतालचा परिसर
स्वच्छ ठेवावा.
’ घरातील रुग्णाला बाहेर जाऊ
देऊ नये.
’ दवाखान्यात सोबत लहान मुलांना
नेऊ नये.
’ रात्री झोपताना मच्छरदाणीचा
वापर करावा.
’ घरगुती उपचार टाळावेत.