समुद्री कासवांचे अस्तित्व अनेक कारणांनी धोक्यात आलेले आहे. या प्रजातीचे जतन करणे आणि संरक्षण करण्यासाठी रोहा वनविभाग अंतर्गत वर्धन परिक्षेत्र व सह्य़ाद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूण यांच्या सहयोगाने कासव संवर्धन मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती रोहा येथील उपवनसंरक्षक रणजितसिंह राणे यांनी दिली.
रायगड जिल्हय़ातील वर्धन तालुक्याचे समुद्रकिनारी मौजे, मारळ, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी ऑलिव्ह रीडले या प्रजातीची समुद्री कासवे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान किनाऱ्याच्या पुळणीवर अंडी देण्यासाठी येत असतात. या प्रजातीचे जतन करणे आणि संरक्षण करणे हा या मोहिमेचा भाग असून त्यानुसार कासवांच्या विणीचे या हंगामामध्ये जाळ्या लावून अंडय़ांना संरक्षण दिले जाते. या अंडय़ांमधून बाहेर आलेली पिल्ले पुन्हा समुद्रामध्ये सोडली जातात.
 साधारणपणे वयाच्या १५व्या वर्षी ही कासवे अंडी घालण्यासाठी सक्षम होतात. वर्षभरात सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास ही कासवे करतात. ऑलिव्ह रीडले प्रजातीची मादी वर्षभरातून एक किंवा दोन वेळा अंडी देते. एका वेळेस १०० ते १५० अंडी दिल्यानंतर ती उबविण्याचा कालावधी ५० ते ६० दिवसांचा असतो. सदर कासवे अंडी देण्यासाठी एकत्र समूहाने त्यांच्या नेहमीच्या किनाऱ्यांवर येतात. खड्डे करून त्यात अंडी देताना काही वेळा, आधी खड्डय़ांत दिलेली अंडी उकरली जातात. किनाऱ्यालगतच्या लोकांकडून खाण्यासाठी अंडी उकरली जातात. याशिवाय कोल्हे, मुंगुस, समुद्र पक्षी कासवांची अंडी खातात. मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या जाळ्यात अडकून किंवा बोटी मचवे यांच्या पंखात अडकून कासवे मृत होण्याचा धोका असतो.
 या सर्व धोक्यांमुळे समुद्री कासवांचे जीवन संकटात आले आहे. त्यामुळे कासवांची उत्पत्ती वाढून त्यांना संरक्षण मिळणे गरजेचे झाले आहे. रोहा वनविभाग ही मोहीम साहाय्यक वनसंरक्षक दीपक सावंत व वर्धन परिक्षेत्र अधिकारी मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग मित्र संस्थेच्या सहयोगाने राबविणार आहे.