कोणतीही करवाढ न सुचविता ५३ लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प स्थायी सभापती राजेश नाईक यांनी सोमवारी सांगली महापालिकेच्या महासभेपुढे सादर केला. ५४२ कोटी रुपये खर्चाच्या या अर्थसंकल्पात महापालिकेची आíथक कोंडी करणाऱ्या एलबीटीच्या उत्पन्नावरच मुख्य भिस्त ठेवण्यात आली असून एक रकमी पाणीपट्टीची योजना सभागृहापुढे ठेवण्यात आली आहे.
तत्कालीन आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्थायी समितीला ४७२ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने यामध्ये वाढ करून ५४२ कोटी १४ लाखाचा अर्थसंकल्प सभागृहापुढे मांडला. यामध्ये स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी वारणा उद्भव योजनेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या शिवाय सांगलीचे गणेश मंदिर व मिरजेतील मीरासाहेब दर्गा परिसराच्या विकासाच्या योजना आखण्यात आल्या आहेत. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला वार्षिक दोन हजार रुपये पाणीपट्टी पुणे महापालिकेच्या धर्तीवर आकारण्यात येणार असून ती दोन टप्प्यात भरण्याची मुभा असेल.
प्रभागाच्या विकासासाठी प्रत्येक सदस्याला २५ लाखाचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकास कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार असल्याचा दावा सभापती नाईक यांनी केला. एलबीटीपासून महापालिकेला १२० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून विविध शासकीय अनुदान जमेस धरून विकास कामांचा डोलारा उभा करण्यात आला आहे.
ब्रिटिशकालीन आयुर्वनि पूल, माईघाट, सांगलीतील काळी खण, मिरजेचा गणेश तलाव यांच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली असून सांगलीतील शिवाजी मंडई येथे अत्याधुनिक भाजी मंडई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी २० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीतील पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
आजच्या अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी चार दिवस मुदत मिळावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिग्वीजय सूर्यवंशी यांनी केली. या मागणीला गटनेते किशोर जामदार यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर महापौर कांचन कांबळे यांनी २१ जुलपर्यंत सभा तहकुबीची घोषणा केली.