मराठवाडय़ातील उद्योजकांची क्षमता, त्यांनी तंत्रज्ञानात घेतलेली भरारी रेल्वे व संरक्षण मंत्रालयातील अधिकारी, तसेच सर्वसामान्यांना कळावी म्हणून औरंगाबाद येथे उद्या (शुक्रवारी) संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत ‘डेस्टिनेशन मराठवाडा’ या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची या वेळी उपस्थिती असेल.
प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाडय़ात रेल्वे-संरक्षणविषयक उपकरणे, तसेच त्यासाठी लागणारी साधनसामग्री औरंगाबादहून खरेदी होईल, असा विश्वास उद्योजकांना वाटतो. प्रदर्शनात शंभरहून अधिक दालने उभारण्यात येणार असून, व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. सरकार, उद्योग व उद्योजकांमध्ये दुवा साधण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती मराठवाडा ऑटो क्लस्टरचे राम भोगले यांनी दिली. संकल्पना, तंत्रज्ञान, डिझाईन इथपासून ते थेट उत्पादनापर्यंतचे सारे टप्पे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शनात व्हेरॉक, ग्राइंड मास्टर, एमआयटी, संजीव ऑटो ग्रुप, अँड्रेस हाऊजर, ऋचा ग्रुप, इन्डुरन्स यांसह मराठवाडय़ातील विविध संघटना, व्यापारी महासंघ सहभाग नोंदवणार आहेत.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार संरक्षण, रेल्वे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील मोठय़ा उद्योगांना लागणाऱ्या यंत्रसामग्री तसेच सुटय़ा भागांची खरेदी देशातीलच लहान, मध्यम व मोठय़ा उद्योगांकडून करण्यात येणार आहे. या तिन्ही क्षेत्रांना अपेक्षित उत्पादने, त्यांचा दर्जा तसेच त्यांची खरेदी प्रणाली आणि इतर आनुषंगिक बाबींसंदर्भात संरक्षण-रेल्वे विभागांतील वरिष्ठ अधिकारी दुपारी दोन ते संध्याकाळी सहा दरम्यान सादरीकरण करणार आहेत. या वेळी प्रश्नोत्तरेही होतील.