खारभूमी विकास विभागाचे दुर्लक्ष

अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील बांधबंदिस्तींच्या कामांकडे खारभूमी विकास विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तालुक्यातील जवळपास १ हजार ५० हेक्टर जमीन यामुळे नापीक झाली आहे. तर दुसरीकडे १० खासगी खारभूमी योजना ताब्यात घेण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू झाले आहेत.

अलिबाग तालुक्यात जवळपास ५ हजार ९९१ हेक्टर इतके खारभूमी क्षेत्र आहे. त्यासाठी ४५ खारभूमी योजना आहेत. पकी ३५ योजना या शासनाच्या ताब्यात तर १० योजना या खासगी आहेत. या योजनांवर बऱ्याचदा शेतकरी स्वत: श्रमदान करून बांधबंदिस्ती करत असतात.

रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. परंतु मुंबईला जवळ असल्याने अनेक उद्योग जिल्ह्य़ात आले. औद्योगिकीकरणाबरोबरच नागरीकरणही वाढले. त्याचा फटका येथील पारंपरिक शेती उद्योगाला बसला. उद्योगांसाठी झालेले  भराव हे शेतीच्या मुळावर आले. भरावांमुळे खाडीचे पाणी शेतजमिनीत घुसायला लागले आणि शेती नापीक व्हायला सुरूवात झाली. यात सर्वाधिक नुकसान हे अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले.

दुसरीकडे खारभूमी विकास विभागाचेही याकडे दुर्लक्ष झाले. जलसंपदा खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या या विभागाला सातत्याने सापत्नभावाची वागणूक मिळत गेली.  बांधबंदिस्तीची वेळोवेळी डागडुजी न झाल्याने शेतीचे नुकसान टाळण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न अपुरे आणि निष्फळ ठरले. या विभागामार्फत करण्यात आलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याने अनेकदा उधाणाच्या पाण्यामुळे बंदिस्तीला भगदाडे पडून खाडीचे पाणी शेतात शिरते. परिणामी सरकारी आकडेवारीनुसार एकटय़ा अलिबाग तालुक्यातील १ हजार ५० हेक्टर म्हणजे अडीच हजार एकर जमीन नापीक झाली आहे.

हजारो एकर जमीन नापीक झाल्यानंतर आता खारभूमी विकास विभागाला जाग आली आहे. या विभागाकडून आता कामे हाती घेण्यात आली आहेत. नाबार्ड अंतर्गत ६ कामे सुरू झाली आहेत. तर राष्ट्रीय चक्रीवादळ कार्यक्रमांतर्गत २ योजनांची कामे प्रस्तावित आहेत. हाशिवरे व माणकुले या दोन योजनांच्या कामांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आले आहेत. तर बाधित योजनांपकी आक्षी साखरगाव, मेढेखार, देहेनकोनी योजनांच्या दुरूस्तीची कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत .

रोजगार हमी योजनेतून तब्बल १ कोटी रूपयांच्या  कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये भिलजी बोरघर येथील उघडी, सांबरी येथील खासगी बांधाची कामे, गोपचरी येथील बांध, बहिरीचा पाडा येथील संरक्षक बंधारा या कामांचा समावेश असल्याची माहिती खारभूमी विकास विभागाकडून देण्यात आली.

खासगी योजना ताब्यात घेणार

एकीकडे शासनाच्या ताब्यात असलेल्या योजना पूर्ण नसताना आजही खासगी असलेल्या योजना ताब्यात घेण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. अलिबाग तालुक्यात १० खासगी योजना असून त्याअंतर्गत १ हजार ५७६ हेक्टर इतके क्षेत्र येते. या योजना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने सीआरझेड मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती अलिबाग खारभूमी विकास विभागाचे शाखा अभियंता सुरेश शिरसाट यांनी दिली.