मुख्यमंत्र्यांची घोषणा

नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा निर्णय त्या त्या ठिकाणची स्थानिक राजकीय समीकरणे पाहून जिल्हा पातळीवर घेण्यात यावा. शिवसेनेला पराभूत करणे, हे आपले लक्ष्य नाही. आज केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवा, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

येथील ग्रॅन्ड मेहफिल हॉटेलच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या बंदद्वार बैठकीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पक्षसंघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह अमरावती विभागातील भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.

नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवरच घ्यावा. शक्य होतच नसेल, तर युती करू नका. शिवसेनेला पराभूत करण्याचे नव्हे, तर भाजपला निवडून आणण्याचे आपले लक्ष्य आहे. निवडून येण्याच्या ईष्रेने काम करा. मर्जीतील उमेदवार लादू नका. एकदिलाने काम करा. जो निवडून येऊ शकेल, त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी भाजपला मतदान केले आहे.

दलित आणि मुस्लिमांनीही भाजपला सहकार्य केले आहे. त्यांना सोबत घ्या. भाजप हा देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्ष आहे. पक्ष आता मोठा झाला आहे, त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी उंचावली पाहिजे, या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जिल्हाध्यक्षांना कानपिचक्या

मुख्यमंत्र्यांनी अमरावती पदवीधर मतदारसंघात मतदारांच्या नोंदणीसंदर्भात जिल्हाध्यक्षांचे कान टोचले. या मतदारसंघात बी.टी. देशमुखांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून भाजपने ही जागा जिंकली. ती टिकवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पदवीधरांची मतदार नोंदणी संथगतीने सुरू असल्याचे आपल्या कानावर आले आहे, हे व्हायला नको. भाजपचा उमेदवार कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघातून निवडून यायला हवा, या दृष्टीने तयारी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अमरावती विभागात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची शक्ती कमी आहे, ती वाढवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत यावेळी थेट चर्चा केल्याची माहिती आहे.