राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भाजपामधून विस्तव जात नसला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी स्वागताच्या पायघडय़ा घतल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंधुदुर्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते आणि गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, शुक्रवारी कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या यादीमध्ये अर्थातच राणे यांचेही नाव आहे. त्यानिमित्त हल्लीच्या राजकीय रिवाजानुसार या नेत्यांच्या स्वागताचे फलक भाजपा आणि सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लावणे स्वाभाविक होते आणि तसे ते लागलेही आहेत. पण त्या सर्व फलकांपेक्षा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राणे यांनी फडणवीस आणि गडकरी यांच्या स्वागताचे कणकवली-कुडाळ पट्टय़ात लावलेले फलक लक्षवेधी ठरले आहेत. कारण राणे यांच्या भाजपाप्रवेशाबाबत गेले काही महिने जोरदार चर्चा आहे. त्यात गडकरी राणेंना प्रवेशासाठी अनुकूल असून केवळ मुख्यमंत्र्यांच्या कट्टर विरोधामुळे तो लांबणीवर पडला असल्याचेही सर्वत्र बोलले जाते. मध्यंतरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी फडणवीस यांच्यासह राणे अहमदाबादला गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. दुसरीकडे राणे मात्र, आपल्याला  भाजपासह सगळ्यांकडूनच ‘मागणी’ असल्याचे सांगत या गोष्टींचा इन्कार करत आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी उघडपणे ‘स्वागतोत्सुक’ म्हणून फलक लावणे कोणत्याच विरोधी राजकीय पक्षाच्या संस्कृतीत बसणारे नाही. तसे करून त्यांनी भाजपा नेत्यांना पुन्हा आपल्या बाजूने सकारात्मक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

या संदर्भात असेही समजते की, राणे यांचे धाकटे चिरंजीव आमदार नीतेश यांचा उद्या वाढदिवस असून त्यानिमित्त गडकरी आणि फडणवीस यांच्यासाठी दुपारी कणकवली येथील राणे यांच्या मालकीच्या ‘नीलम कंट्रीसाइड’ या हॉटेलमध्ये जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. पण कार्यक्रमाची वेळ बदलल्यामुळे तो फसला आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग  शिवसेनेचे नेते व गृह खात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी फक्त ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. मुख्यमंत्री किंवा गडकरी यांचा त्यावर उल्लेखही नाही.

यापूर्वी रत्नागिरी चौपदरीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ २९ जानेवारी २०१६ रोजी रत्नागिरीजवळ हातखंबा येथे झाला होता. त्यावेळी गडकरींच्या खास निमंत्रणावरून राणे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी गडकरींवर स्तुतिसुमने उधळली, पण मंचावर उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्याचा कारभार चालवण्याबाबत कानपिचक्या दिल्या होत्या, हेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे.