शुक्रवारी पहाटे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसचा इंजिनासह एक डबा इगतपुरी स्थानकालगत रुळावरून घसरला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाडय़ा ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या, तर काही गाडय़ा पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्या. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
सिकंदराबादहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस पहाटे सव्वाचार वाजता इगतपुरी स्थानकाजवळ आली असता इंजिनाच्या पुढील भागातील मोठी लोखंडी सळई निखळल्याने रेल्वेचा रूळ तुटला आणि इंजिनासह एक डबा रुळावरून खाली उतरला. या वेळी रेल्वे रुळाला अनेक ठिकाणी तडे गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. रेल्वे प्रशासनाने लगेच धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अवघ्या तासाभरात रेल्वे इंजिनासह घसरलेला डबा रुळावर आणण्यात आला. तब्बल सहा तासांनंतर ही गाडी हलविण्यात आली. अपघातामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. अनेक गाडय़ा घोटी-नाशिक रोडदरम्यान थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
पंचवटी एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पंजाब एक्स्प्रेस आदी गाडय़ा काही वेळ थांबविण्यात आल्या होत्या. नंतर त्यांना पर्यायी मार्गाने रवाना करण्यात आले. दरम्यान, रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात असून लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.