किल्ले रायगडावर ६ जून रोजी होणा-या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापुरातून सुमारे १० हजार शिवभक्त रवाना झाले आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ चा अखंड गजर करीत आणि भगवा ध्वज खांद्यावर नाचवत शिवप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते.
युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा शौर्यशाली इतिहास जाणण्यासाठी रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. त्यानिमित्त युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासमवेत गडचढाई करण्याचा मान शिवभक्तांनाही मिळणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींच्या स्फूर्ती, प्रेरणादायी इतिहासाचा जागर रायगडावर केला जाणार आहे. ६ जून रोजी पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर भव्य भगवा ध्वज उभारण्यात येईल. मुख्य राज्याभिषेक सोहळा युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते होईल.
या सोहळ्यावेळी सप्तनद्या, सागर यांचा जलाभिषेक, राजपुरोहितांचा मंत्रोच्चार करण्यात येणार असून, महाराष्ट्रातील अनेक शिवकालीन युद्धकला विशारद आपली प्रात्यक्षिके रणहलगी, रणिशगाच्या निनादात सादर करणार आहेत. भव्य पालखी सोहळा, छत्रचामरांसह शिवरायांच्या प्रतिमेची शोभायात्रा हे खास आकर्षण असणार आहे.