एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यातील जनतेचे हाल होत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेले वक्तव्य पाहता त्यांना संप मिटवायचा आहे की चिघळवायचा आहे ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यासाठी त्यांनी केलेला संप याबद्दल सकाळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाष्य केले होते. ‘सरकारकडे तिजोरीत पैसेच नाहीत. त्यामुळे पुढील २५ वर्षे तरी सातवा वेतन आयोग लागू करू शकत नाही’, असे रावते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते.

ऐन दिवाळीत सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे हाल होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने एसटी कर्मचार्‍यांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. ‘एसटीचे कर्मचारी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून संघर्ष करत होते. मात्र सरकारने मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळेच त्यांच्यावर संपाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले असते, तर आज राज्यातील प्रवाशांचे हाल झाले नसते,’ असे मुंडे यांनी म्हटले.

‘एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या अतिशय रास्त असून, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सन्मानजनक तोडगा काढून कर्मचार्‍यांना योग्य न्याय द्यावा,’ अशी मागणी मुंडे यांनी केली. राज्यातील संगणक परिचालकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडेही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाचीही दखल घेऊन संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांच्या समवेत परभणीचे आ. विजय भांबळे, आ. विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या.