अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज कृती समितीने सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. महायुतीच्या नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. नऊ दिवस हे उपोषण सुरू होते.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार पंकजा मुंडे पालवे, पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, विजय शिवतारे आदी नेत्यांनी उपोषणास बसलेल्या कृती समितीच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या उपोषण सांगता सभेत  फडणवीस म्हणाले की, धनगर समाजाने ज्या ताकदीने, ज्या हिमतीने लढा दिला आहे आणि ज्या आरक्षणाची मागणी केली आहे ती मागणी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर निश्चितपणे पूर्ण करू. या सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सुळ, राम िशदे, बाबुराव पाचर्णे, शरद ढमाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेली सदुसष्ट वर्षे आम्हाला आरक्षण देण्यात आलेले नाही. मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण दिले गेले त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र धनगर समाजाला अनेक वर्षांपासून मागणी करूनही आरक्षण का दिले जात नाही, असा प्रश्न यावेळी जानकर यांनी उपस्थित केला. धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न भाजपप्रणीत मोदी सरकारच सोडवेल असा विश्वासही जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.
शुक्रवारी शक्तिप्रदर्शन
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी सरकारवर दबाव आणण्याकरता ‘धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समिती’च्यावतीने शुक्रवारी मुंबईत मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. १९५६ सालापासून अनुसूचित जमातीतून ‘धनगड’ समाजाला आरक्षण दिले जाते, परंतु महाराष्ट्रात ‘धनगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच समाजाला या आरक्षणाचे फायदे मिळत नाहीत. धनगर समाजाला हे आरक्षण दिले जावे यासाठी समितीतर्फे राज्यात आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी येत्या १ ऑगस्टला ११ वाजता राणीच्या बागेपासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येईल. धनगरांच्या पारंपरिक वेशभूषेत आणि शेळ्या-मेंढय़ासह समाजबांधव यात सहभागी होतील. मोर्चानंतर होणाऱ्या सभेत १२ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीचे राज्य समन्वयक नवनाथ पडळकर आणि मुंबई विभाग समन्वयक ललित बंडकर यांनी पत्रकारांना दिली.