धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी या समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाभरातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कमलाकर दाणे, संदीप वाघमोडे, यशवंत डोलारे, अनिल ठोंबरे आदी कार्यकर्त्यांनी गेल्या ३१ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले. मात्र, यानंतरही सरकारला जाग आली नाही. उपोषणाला पाठिंबा व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. बार्शी नाका परिसरातील जिजाऊ चौकातून दुपारी एक वाजता मोर्चा निघाला. भंडाऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, सदस्य सुधाकर व्हट्टे, मिच्छद्र ठवरे, डॉ. गोिवद कोकाटे, गणेश सोनटक्के आदींचा सहभाग होता.
‘ऊठ धनगरा जागा हो..आरक्षणाचा धागा हो’, ‘येळकोट येळकोट’ आदी घोषणांनी मोच्रेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर सभेत रूपांतर झाले. मोर्चामध्ये मोठा सहभाग असल्यामुळे कार्यालयासमोरील दोन्ही रस्ते जाम झाले होते. मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले. त्यामुळे प्रशासनाने वाहतूक अन्य मार्गाने वळविली. या वेळी चोख बंदोबस्त होता.