धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ ठरल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यात एक एसटी बस पेटवून दिली. बारामती येथे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे गेल्या आठवडय़ापासून उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांबरोबर धनगर समाजाच्या नेत्यांची चर्चा झाली. मात्र, यामध्ये कोणतीही तडजोड न निघाल्याने येथील कार्यकत्रे संतप्त झाले होते. यातूनच या कार्यकर्त्यांनी रात्री सव्वाअकराच्या सुमारास कराडहून सोलापूरकडे जाणारी एसटी पेटवून दिली. या वेळी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते. या प्रकरणी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून चौघांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.