धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याच्या मुद्यावरून आदिवासी आणि धनगर समाज संघटना यांच्यात जुंपली आहे. आदिवासींच्या कोटय़ातून धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शविण्यासाठी शनिवारी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बचाव संघटनेने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा काढला. दुसरीकडे धनगर समाजाच्या मागणीला विरोध केल्यामुळे जळगावच्या चोपडा शहरात धनगर समाज संघटनेने आदिवासी नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षण मागणी विरोधात महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र आदिवासी वेल्फेअर असोसिएशन-नंदुरबारच्यावतीने नाशिक येथे निर्धार मोर्चाचे आयोजन केले होते. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. निर्मला गावित यांच्यासह लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. धनगर व तत्सम जातींचा नाम साधम्र्याचा फायदा घेऊन आदिवासींमध्ये समावेश करण्यासाठी काही राजकीय मंडळी प्रयत्नशील आहेत. राजकीय स्वार्थासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. धनगर व इतर जातींच्या आरक्षणाबाबत शासनाने घाईत कोणताही निर्णय घेतल्यास त्याला कायदेशीर आव्हान दिले जाईल, असे मोर्चेकऱ्यांनी सूचित केले. नाम साधम्र्याचा फायदा घेत खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या व जमिनी बळकाविणाऱ्या बोगस आदिवासींवर कारवाई केली जात नसताना धांगड व धनगर या स्वतंत्र जमाती असताना त्यांना आदिवासी म्हणून घेण्याचा अधिकार काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध असून, द्यायचे असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, असे पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. धनगर समाजाला आदिवासींच्या कोटय़ातून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
धनगर समाजाच्या आरक्षणास विरोध करणाऱ्या या मोर्चाचे पडसाद जळगाव जिल्ह्य़ातील चोपडा शहरात उमटले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे ही प्रदीर्घ काळापासून रखडलेली मागणी आहे. त्यास आदिवासी विकासमंत्री पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी व विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके विरोध करत आहेत. या पाश्र्वभूमीवर, संबंधितांच्या विरोधात घोषणाबाजी करत धनगर समाज संघटनेने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले. जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन केल्यावरून संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Agri-Kunbi, Bhiwandi, Agri-Kunbi votes,
भिवंडीत आगरी-कुणबी मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?