धुळे शहरातील पाचकंदील भागातील एका घरात लागलेल्या भीषण आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. रामकुमार शर्मा (३५), त्यांच्या पत्नी जयश्री शर्मा (३०), आई शोभा शर्मा (७०), मुले साई शर्मा (१२) व राधेय शर्मा (१०) अशी मृतांची नावे आहेत.

अकबर चौक परिसरातील पाचकंदील भागातील जून्या दुमजली घरात शर्मा कुटुंबीय राहत होते. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घरात आग लागली. आगीतून बाहेर पडता न आल्याने शर्मा कुटुंबांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रामकुमार हे शहरातील चौथ्या गल्लीतील दक्षिण मारुती मंदिरात पुजारी होते. या आगीत शर्मा यांचे घर जळून बेचिराख झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल,पोलीस,सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील रहिवाश्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण शर्मा कुटुंबाला वाचवण्यात यश आले नाही.

घडले एकतेचे दर्शन

पाच कंदील परिसरात बहुसंख्य मुस्लिम रहिवासी राहतात. या भागातील उस्मान, जावेद भाई, एजाज अन्सारी, मुजफ्फर, मसुद भाई, वसीम बारी, साजीज अन्सारी यांनी यावेळी मदतकार्य केले. आग आटोक्यात आणणे आणि घरातील लोकांना बाहेर काढण्यासाठी या सर्वांनी शक्य त्या ठिकाणाहून आगीच्या लोळात धुमसत असलेल्या घराच्या छतावर प्रवेश केला. एका भिंतीचे बांधकाम काढून तेथून अग्निशामक बंबाचा पाईप आत टाकण्यात आला आणि पाण्याचा मारा करण्यात आला.घरात धुमसणारी आग आणि धुराचे लोळ यामुळे मदतकार्य करणारेही अखेर हतबल झाले. आपला जीव धोक्यात घालून या तरुणांनी गंभीररित्या भाजलेल्या शर्मा कुटुंबीयांना घराबाहेर काढले.

घर बांधकामात लाकडाचा वापर असल्याने आग अधिकच भडकली. अतिशय दाट वस्ती आणि अरुंद रस्ते तसेच व्यवसायानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर ठेवलेले साहित्य यामुळे मदत कार्यात अडथळे आले. घटनास्थळी दाखल होताना अग्निशामक दलाच्या बंबांना अडथळे येत होते. दुसरीकडे अग्निशमन दलाचा बंब उशिरा आल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे बंब तत्पर घटनास्थळी आले असता तर मृतांपैकी किमान कोणाचा तरी जीव वाचवता आला असता अशी खंत स्थानिकांनी बोलून दाखवली.

शर्मा यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा असून इतर तिन्ही बाजूनी भिंती उभारण्यात आल्या होत्या.यामुळे घरातील एकही व्यक्तीला घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.  दक्षिण मुखी मारुती मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना या घटनेची माहिती मिळताच तेदेखील गहिवरले. जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.