केंद्रात डॉ. सुभाष भामरे यांना मंत्रिपद मिळाल्याचा आनंद जिल्ह्य़ात साजरा होत असतानाच राज्य मंत्रिमंडळातही जयकुमार रावल यांच्या रूपाने धुळ्याला स्थान मिळण्याचे निश्चित झाल्याने एक तप मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्य़ातील नागरिकांच्या आनंदोत्सवात भर पडली आहे. िशदखेडय़ाचे आमदार रावल यांचे नाव गुरूवारी भाजपतर्फे निश्चित झाल्यावर धुळ्यासह दोंडाईचा, शिरपूर, शिंदखेडय़ात आतषबाजी करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

राज्य मंत्रिमंडळात आमदार अमरिशभाई पटेल यांच्यानंतर १२ वर्षे जिल्ह्य़ाला संधी मिळालेली नाही. सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले जयकुमार रावल यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी पहिल्यापासून अपेक्षा बाळगण्यात येत होती. परंतु, सरकार स्थापनेपासून मंत्रिपद त्यांना हुलकावणी देत राहिले. अखेर उशिरा का होईना त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे निश्चित झाले आहे.

२००४ मध्ये तत्कालीन कामगार राज्यमंत्री सहकार महर्षी पी.के.अण्णा पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करुन वयाच्या २८ व्या वर्षी रावल यांनी आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. त्यानंतर विजयाची हॅटट्रीक केली. ३९ वर्षांचे रावल यांनी पुणे येथील सिम्बॉयसिस संस्थेतून वाणिज्यची पदवी मिळवली आहे. रावल हे पश्चिम खान्देशातील संस्थानिक परिवारातील आहेत. त्यांचे आजोबा दादासाहेब ज. दौ. रावल हे स्वातंत्र्यसनिक. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मुंबई स्टेटचे आमदार होते. १९७२ मध्ये दादासाहेबांनी युनिव्हर्सल स्टार्च केम अलाईट हा मक्यावर प्रक्रिया करणारा उद्योग आपल्या दोंडाईचासारख्या लहानश्या गावात सुरु केला. या प्रकल्पामुळे दोंडाईचासह धुळे</span>, नंदूरबार जिल्ह्यातील हजारो बेरोजगांराना काम मिळाले. जयकुमार रावल यांचे वडील सरकारसाहेब रावल हे स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेच्या अंतर्गत अनेक शाखा सुरु आहेत. . रावल यांच्या आई नयनकुंवरताई रावल यांनी दोंडाईचा पालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून जबाबदारी पेलली आहे. जयकुमार रावल हे संस्थानिक परिवारातील असल्याने त्यांचे नातलग हे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील राजघराण्यात आहेत.