धुळ्यातील दंगल रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून येते आहे. दंगल रोखण्यासाठी गोळीबार करण्याची गरज पडल्यास अपवादात्मक स्थितीत समाजकंटकांच्या कंबरेखाली पोलिसांना गोळीबार करता येतो. मात्र, धुळ्यात पोलिसांनी दंगेखोरांच्या दिशेने कंबरेच्यावर गोळीबार केल्याचे दिसते. इंडियन एक्स्प्रेसला यासंदर्भातील व्हिडिओ मिळाले आहेत.
धुळ्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा जण मृत्युमुखी पडले. सहा जानेवारीला रस्त्यावर लावण्यात आलेल्या एका स्टॉलधारकाचे बिल देण्यावरून वाद झाल्यावर त्याचे पर्यवसान पुढे दंगलीत झाले होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कंबरेच्यावर गोळ्यांच्या जखमा दिसून आल्या आहेत.
व्हिडिओ १ – धुळे दंगल
व्हिडिओ २ – धुळे दंगल
व्हिडिओ क्लिप्समध्ये एक कॉन्स्टेबल आपल्या वरिष्ठांकडून रायफल घेताना दिसतो. त्यानंतर त्याने दंगेखोरांवर थेट कंबरेच्यावर गोळीबार केल्याचे दिसते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोळीबार सुरू करण्यापूर्वी कोणताही इशारा दिला नाही. “एका कॉन्स्टेबलने आपल्या रायफलमधून गोळ्यांच्या तीन फैरी झाडल्या. त्यातील एक गोळी इम्रान अली नावाच्या व्यक्तीच्या मानेखाली लागली. त्यातच त्याचा मृत्यू झाला,” असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू कॉन्स्टेबलच्या गोळीमुळेच झाला का, याची खातरजमा इंडियन एक्स्प्रेस करू शकलेला नाही.
पोलिसांना अनुचित घटना टाळण्यासाठी गोळीबार करण्याची गरज पडल्यास त्याआधी दंगेखोरांना पुरेसा इशारा देणे गरजेचे असते. तसेच गोळीबार करण्याचा उद्देश हा समोरील कोणत्याही व्यक्तीला ठार मारणे हा नसून, केवळ जमावाला पांगवणे एवढाच असला पाहिजे, असे पोलिसांसाठीच्या मार्गदर्शक नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.