आजच्या काळात जगताना भेडसावणाऱ्या समस्या, त्या समस्यांची तीव्रता आणि त्यामुळे बोथट झालेल्या मानवी संवेदना यांचे प्रतिबिंब सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेच्या नाशिक विभागातील प्राथमिक फेरीच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या एकांकिकांमध्ये पडले. सेझ, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचारपासून कॉर्पोरेट स्तरावरही महिलांची होणारी घुसमट, संवेदना बोथट झाल्यावर येणारा निगरगट्टपणा, यासारख्या वैविध्यपूर्ण विषयाची सुरेख मांडणी करणाऱ्या आठ एकांकिका या प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी नाशिक केंद्रावर सादर झाल्या.

येथील महाकवी कालिदास कला मंदिरातील नाटय़ परिषदेच्या सभागृहात स्पर्धेनिमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पना व विचार शक्तीचा संगम पाहावयास मिळाला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रविवारी पहिल्या दिवशी शहरी तसेच ग्रामीण भागातील आठ महाविद्यालयांनी एकांकिका सादर केल्या. ‘एमईटी’ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या चमूने ‘भारत माझा देश आहे’द्वारे आधुनिक जीवनशैली अंगीकारताना पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, शेतक ऱ्यांचे प्रश्न, यावर प्रकाश टाकला. मुक्त विद्यापीठाच्या ‘एका गाढवाची गोष्ट ’मधून बोथट होणाऱ्या मानवी संवेदनांवर बोट ठेवत प्राण्यांना आवश्यक वैद्यकीय सेवांविषयी सूचक विधान करण्यात आले. क. का. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या नाटय़ विभागाने भ्रष्टाचाराविरोधात असलेली तरुणाईतील अस्वस्थता, झटपट प्रसिध्दी मिळविण्याचा फंडा, याकडे लक्ष वेधले. सिन्नरच्या गु. मा. दां. कला आणि भ. वा. विज्ञान महाविद्यालयाने विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात ‘सेझ’मुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. इगतपुरीच्या ना. शि. प्र. मंडळाच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने तरुणाईमध्ये वाढलेली व्यसनाधीनता, त्याचे दुष्परिणाम याची गहनता ‘तो मारी पिचकारी, सनम मेरी प्यारी’ मधून दाखवली.

के. पी. जी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने ‘जीवाची मुंबई’ मधून मुंबई बॉम्बस्फोट तर, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाने ‘द परफेक्ट ब्लेंड’मधून नात्यांची भावनिक गुंतवणूक, मानवी भावविश्व, हे विषय मांडले. शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरने ‘टिळक इन ट्वेण्टीफर्स्ट सेंच्युरी’ द्वारे सद्यस्थितीत टिळकांचे, त्यांच्या विचारांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी चारूदत्त कुलकर्णी व अंशू सिंग यांनी काम पाहिले. आयरीस प्रॉडक्शनच्यावतीने दीपक करंजीकर, विद्या करंजीकर उपस्थित राहिले.

आज सादर होणाऱ्या एकांकिका

’भि. य. क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालय – दोघी

’ के. टी. एच. एम. कला आणि वाणिज्य महाविद्यालय – व्हॉट्स अ‍ॅप

’ शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालय, सिन्नर – वादळवेल

’ म. स. गा. महाविद्यालय, मालेगाव – एक अभियान

’ कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय, सटाणा – बाबा ४२०, शेंडीवाला

’ कै. बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय – कोलाज्

’ लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय – जंगल

’ क. का. वाघ महाविद्यालय (परफॉर्मिग आर्ट, संगीत विभाग) – त्रिकाल

’ हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय – जेनेक्स