नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर संचालकांच्या २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. तब्बल ११ वर्षांनंतर बँकेची निवडणूक होत आहे. दोन गटांतील राजकीय लढाईला खासदार अशोक चव्हाण विरुद्ध भास्करराव खतगावकर असे स्वरूप आले आहे.
निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजता संपली. तत्पूर्वी वेगवेगळय़ा मतदारसंघांतून ६७ अर्जदारांनी माघार घेतली. सकाळ व दुपारच्या सत्रांमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या. पण त्यातून सन्मान्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे खासदार चव्हाण व आमदार डी. पी. सावंत यांच्या गटाने २१जणांच्या बँक बचाव पॅनेलची घोषणा करून टाकली. या पॅनेलमधील सर्व उमेदवार नवीन आहेत. पण त्यांच्यावर कोणताही ठपका नाही, असे आमदार सावंत व ओमप्रकाश पोकर्णा यांनी नमूद केले. दुसऱ्या बाजूला बँकेचे माजी अध्यक्ष भास्करराव खतगावकर, मोहन पाटील टाकळीकर, माजी उपाध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हरिहरराव भोसीकर तसेच बापूसाहेब गोरठेकर आदी काँग्रेसेतर नेते एकत्र आले. त्यांनी जुन्या-नव्याची मोट बांधत स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने बँकेच्या इतिहासातील अत्यंत चुरशीची लढत या निमित्ताने होणार आहे. या निवडणुकीसाठी ५ मे रोजी मतदान घेण्यात येईल.