येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्य तातडीने सुरू होऊन आपदग्रस्तांना मदत मिळणे आवश्यक असल्याने आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित केलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. या बठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, अलिबाग प्रांत सर्जेराव सोनवणे, पेण प्रांत श्रीमती प्रेमलता जैतु, पनवेल प्रांत भरत शितोळे, कर्जत प्रांत दत्ता भडकवार, रोहा प्रांत सुभाष भागडे, महाड प्रांत श्रीमती सुषमा सातपुते, श्रीवर्धन प्रांत तेजस समेळ, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र दंडाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. नागांवकर, उपवनसंरक्षक रोहा विजय सूर्यवंशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बा. आ. मंगसुळे, तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी व संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीनुसार आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करावा, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरही तेथील परिस्थितीनुसार आपत्ती आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करून आपदग्रस्तांना मदत देणे महत्त्वाचे असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील असलेली साधनसामग्री सुस्थितीत ठेवावी.
जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा तसेच रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. स्थलांतरित आपदगस्तांना तात्पुरता निवारा देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा सुस्थितीत ठेवाव्यात. त्यामध्येही आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पुरेळा अन्नधान्याचा योग्य पुरवठा होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य नियोजन करावे. तसेच तहसीलदारांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व गोदामांचा आढावा घेऊन ती सुस्थितीत ठेवावीत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठीही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने योग्य ती दक्षता घ्यावी.
आपत्ती परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांची मॉक ड्रिल (प्रात्यक्षिक) करून घेऊन त्याचा आढावा घ्यावा व त्रुटी आढळल्या त्या तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात. सर्व ठिकाणची पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत ठेवावे अशाही सूचना त्यांनी दिल्या.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापनामार्फत १०७७ ही हेल्पलाइन दिवसाचे २४ तास सुरू आहे. मदतीसाठी टोल फ्री क्रमांक आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापनामार्फत १०७७ ही हेल्पलाइन दिवसाचे २४ तास सुरू आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टी तसेच भरती, संभाव्य धोक्याच्या इशाऱ्याबाबतची माहिती जनतेला व्हावी यासाठी वेळोवेळी ही माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.
धरणप्रणव गावात गावनिहाय बठका तसेच तालुका स्तरावर बठक घेऊन योग्य नियोजन करावे. त्या त्या क्षेत्रासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करावी. तालुका आणि नगर पालिकामध्ये कंट्रोल रूम सुरू करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिल्या व आपत्कालीन व्यवस्थापन आराखडय़ासंदर्भातील माहिती सादरीकरणाद्वारे त्यांनी दिली.