गावच्या पार, कट्टय़ापासून शहराच्या पान टपरीवर व्हाया ढाब्यावर रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या चच्रेमुळे धाकधुक वाढविणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून २४ फे-यांसाठी ४५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी १६ मे रोजी वखार महामंडळाच्या गोदामात होणार असून दुपापर्यंत सांगलीचा खासदार कोण? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच सहा महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभेची बीजे रोवली असल्याने सामान्यांपासून नेत्यांपर्यंत उत्सुकता ताणली गेली असून जेवणापासून मुंडणापर्यंत पजा लावण्यात आल्या आहेत.
लोकसभा मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एका फेरीत ८४ टेबलावर ८४ यंत्रातील मतांची गणना केली जाणार आहे. एक टेबल पोस्टाची मते मोजण्यासाठी नियोजित करण्यात आला आहे.  विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येवर मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.  विधानसभा मतदार संघनिहाय मतदार केंद्रे व मतमोजणी फेऱ्या पुढील प्रमाणे राहणार आहेत. मिरज २८६-२१, सांगली २८१-२१, पलूस-कडेगांव २६९-२०, खानापूर ३३६-२४, तासगांव-कवठेमहांकाळ २८५-२१ आणि जत २८५-२१ अशा मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.  सकाळी ८ वाजता प्रत्यक्षात मतमोजणीस प्रारंभ होणार असला तरी कर्मचा-यांना सकाळी ६ वाजता मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्दोष देण्यात आले आहेत.  दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार असलेतरी अंतिम निकाल दुपारी २ वाजेपर्यंत अपेक्षित आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, तीन निवडणूक निरीक्षक, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती मौसमी बर्डे, विधानसभानिहाय प्रत्येकी एक या प्रमाणे सहा सहाय्यक अधिकारी यांच्या नजरेखाली ही मतमोजणी होणार आहे.
लोकसभेसाठी यावेळी चुरशीने ६३.७१ टक्के मतदान झाले आहे.  शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात स्थानिक निवडणुकीप्रमाणे चुरशीने मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  यावेळी काँग्रेस, भाजपा, आप, जनता दल, बहुजन मुक्ती मोर्चा आदी राजकीय पक्षांसह १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.  या शिवाय नकारार्थी मत नोंदविण्याचा अधिकार देण्यात आला असल्यामुळे मतदान नोंदणीसाठी दोन यंत्रांची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली.
मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे सांगलीत इतिहास घडणार की, परंपरा कायम राहणार यावरून कार्यकर्त्यांत पजा लागल्या आहेत.  साध्या चहा पार्टीपासून डोक्याचे मुंडण करण्यापर्यंत या पजा लागल्या आहेत. गावच्या पार, कट्टय़ावर निवडणूक निकालावरून दररोज चच्रेच्या होत आहेत.  सातत्याने निवडणुकीत राजकीय पक्षांची धुरा सांभाळणारे कार्यकत्रे मतदानाची टक्केवारी घेऊन आकडेमोड करण्यात मग्न आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राजकीय कार्यकर्त्यांचे कर्तृत्व समोर येणार असल्याने कोणत्या भागात कोणाला मतदान झाले यावर विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता असल्याने उमेदवारापेक्षा विधानसभेसाठी इच्छुकांनीच देव पाण्यात ठेवले आहेत.