सोलापूर शहर व जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेसमधील कायम असलेल्या गटबाजीतून एकमेकांच्या विरोधात शह-प्रतिशहाचे राजकारण सुरूच असताना शहरात महापालिकेत पक्षाचे उपमहापौर व गटनेते हे एकमेकास गुद्दागुद्दीपर्यंत भिडले. त्यामुळे पक्षाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. या घटनेची गंभीरपणे दखल पक्षश्रेष्ठी कितपत घेतात, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
जिल्हा ग्रामीण राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची पकड आहे. परंतु अलीकडे पाच-सहा वर्षांपासून गटबाजी मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे पक्ष एकसंध राहिला नाही. तर शहरात मुळातच कमी ताकद असलेल्या या पक्षात गटबाजीचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची झळ पक्षाने उभे केलेल्या उमेदवारांना बसली होती. विशेषत: सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व सोलापूर दक्षिण  या तिन्ही जागांवर अनामत रक्कमदेखील गमवावी लागल्याने पक्षाची इभ्रत गेली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पसंत केलेल्या एका महिला उमेदवाराला सुमारे २५ हजारांपर्यंत मतांची अपेक्षा असताना जेमतम सातशेच मते घेता आली होती. यासंदर्भात शरद पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चा झाली खरी; परंतु त्यातून ठोस कारवाईचे संकेत मिळाले नाहीत.
या पाश्र्वभूमीवर पक्षातील बेदिली वाढतच चालली असून, महापालिकेत पक्षाचे उपमहापौर प्रवीण डोंगरे व पक्षाचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्यात धुसफूस होऊन त्याचे पर्यावसान गुद्दागुद्दीत झाले. पालिका सर्वसाधारण सभेसाठी आयोजिलेल्या पक्षाच्या बैठकीत कोल्हे यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमहापौर डोंगरे यांच्यावर चढाई केली. महिला नगरसेवकांच्या देखत असभ्य भाषा वापरून एकमेकांचा उद्धार केल्यानंतर कोल्हे व डोंगरे यांची एकमेकांची कॉलर पकडून ठोसे लगावण्यापर्यंत मजल गेली. उपमहापौर डोंगरे हे गटनेत्याला विश्वासात घेत नाहीत, असा कोल्हे यांचा आक्षेप आहे, तर उपमहापौर डोंगरे यांनी कोल्हे यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करतात. डोंगरे हे पक्षाचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निष्ठावंत समजले जातात.
काँग्रेसमध्येही धुसफूस
दरम्यान, इकडे महापालिकेत राष्ट्रवादीत उपमहापौर व गटनेत्यांची गुद्दीगुद्दीपर्यंत मजल गेली असताना दुसरीकडे प्रमुख सत्ताधारी काँग्रेसमध्येही धुसफूस वाढत आहे. त्याचे कारण पक्षांतर्गत गटबाजी नाहीतर पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा कारभार असल्याचे दिसून येते. गुडेवार हे सत्ताधा-यांना विश्वासात न घेता कारभार करतात, सत्ताधा-यांच्या अधिकारावर अतिक्रमण करतात, असा आक्षेप पालिका स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री यांनी यापूर्वीच घेत पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. हाच मुद्दा पालिकेत पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत छेडला गेला असता बहुसंख्य नगरसेवकांनी आयुक्तांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. या बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महापौर प्रा. सुशीला आबुटे, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री आदींनी चर्चेत भाग घेतला होता.