भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचे जिल्हय़ात तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्वच स्तरावर याबाबत असंतोष व्यक्त होत असून, इंदिरा काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग आदींनी या अन्यायाच्या विरोधात जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.  
याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना थोरात यांनी गोदावरी महामंडळाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले, जायकवाडी धरणातील पाणीसाठा मोजणीच मुळात चुकीची आहे. तरीदेखील खरोखरीच दुष्काळी स्थिती होती. धरणातला पाणीसाठा शून्यावर आला होता, त्या वेळी मानवतेच्या भावनेतून पिण्यासाठी पाणी सोडले. त्या वेळी सर्वानी मोठय़ा मनाने सहकार्य केले. मात्र या वेळची परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. आता तशी वेळ नसून जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतीकरताही पुरेसे पाणी आहे. अशा स्थितीत खाली पाणी सोडण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे थोरात यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी नगरला पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचा निषेध करतानाच त्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. ते म्हणाले, सध्या जायकवाडीत ४७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ते मराठवाडय़ाला पिण्यास पुरेसे आहे. मुळा धरणात मात्र डेड स्टॉक वगळता १४ टीएमसीच पाणी आहे. गोदावरी खो-यात मुळातच पाणी उपलब्ध नसताना जायकवाडी बांधण्यात आले. त्यासाठी मुळा धरणाची उंची १० फूट कमी करण्यात आली. जायकवाडीसाठी नगर जिल्हय़ातील २५ ते ३० गावांचे भूसंपादन करण्यात आले. आता पाणी सोडून जिल्हय़ावर पुन्हा अन्याय सुरू आहे. याबाबत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशीही चर्चा झाली असून, आंदोलनाच्या मुद्दय़ाशी सहमत आहेत, असे अभंग म्हणाले.

एकेक आवर्तन कमी होणार!
जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय दुर्दैवी असून सरकारने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, अशी टीका आमदार कांबळे यांनी केली. राष्ट्रवादीचे वैभव पिचड, काँग्रेसचे राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, भाजपचे बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले या आमदारांना पाणी सोडण्याच्या निर्णयाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे कालवा सल्लागार समितीने केलेले पाटपाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडणार आहे. या निर्णयामुळे आता भंडारद-याचे एक व मुळेचे एक शेती आवर्तन कमी होईल.