जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालास काही तास राहिले असताना याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या (गुरुवारी) नगरला मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. दरम्यान सुरुवातीला एकतर्फी वाटणा-या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात चांगलीच चुरस निर्माण झाली असून, त्यामुळेच सेवा संस्था मतदारसंघात विखे गट मुसंडी मारण्याची शक्यता व्यक्त होते.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मंगळवारी विक्रमी ९९ टक्के मतदान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सैनिक सभागृहात मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता त्याला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी व्याक्त केला. बँकेच्या एकूण ३ हजार ७६० पैकी ३ हजार ७२२ सभासदांनी (९८.९९) मतदान केले. संचालकांच्या २१ जागांपैकी सहा ठिकाणच्या सेवा संस्थांच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १५ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी-थोरात गटाचे सत्ताधारी शेतकरी विकास मंडळ व विखे-भाजप-शिवसेना यांची जिल्हा विकास आघाडी यांच्यात या निवडणुकीत चुरस आहे. याआधी बिनविरोध विजयी झालेल्या सहापैकी राष्ट्रवादी-थोरात गटाचे दोन (चंद्रशेखर घुले, उदय शेळके), विखे गटाचे तीन (अण्णासाहेब म्हस्के, आमदार शिवाजी कर्डिले, अरुण तनपुरे) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी-थोरात गटाचे समजले जाणारे माजी आमदार राजीव राजळे यांनी ऐनवेळी वेगळी चूल मांडली. तेही बिनविरोध विजयी झाले आहेत. मतदान झालेल्या १५ जागांमधील सेवा संस्थेच्या जामखेड, कर्जत, श्रीरामपूर व श्रीगोंदे या चार जागांबाबत कमालीची उत्सुकता असून या जागांवर विखे गटाला संधी असल्याचे सांगण्यात येते. सेवा संस्थेच्याच कोपरगावच्या जागेबाबतही जिल्ह्य़ात उत्सुकता आहे.