परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी मंगळवारी ९८.६७ टक्के मतदान झाले. परभणी व िहगोलीमधील १४ तालुक्यांत १५ केंद्रांवर हे मतदान शांततेत पार पडले. ३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्याचा फैसला गुरुवारी (दि. ७) होईल. बँकेवर वर्चस्व कोणाचे, याचा निर्णय निकालानंतर ठरणार आहे. निवडणूक शांततेत पार पडली असली, तरी निवडणुकीत अक्षरश: लाखो रुपयांचा चुराडा झाला.
बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ४ एप्रिलला निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. परभणी जिल्ह्यातील १, तर िहगोलीतील ५ संचालक बिनविरोध निवडून आले. उर्वरित १५ जागांसाठी १४ तालुक्यांत मतदान घेण्यात आले. िहगोलीतील पाचही मतदान केंद्रांवर पणन व प्रक्रिया, बिगरशेती, महिला राखीव, भटके विमुक्त जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात मतदान घेण्यात आले. परभणी जिल्ह्यात परभणी वगळता इतर ८ तालुक्यांच्या ठिकाणी सोसायटीसह इतर ७ मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात आले. सर्वच मतदारसंघांत सरळ लढती होत्या. त्यामुळे उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आपल्याला आवश्यक मतदार संख्येचा आकडा गाठण्यासाठी उमेदवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. काही ठिकाणी अपेक्षित मतदारांचा आकडा जुळून आल्यानंतर उमेवार निर्धास्त दिसले, तर काहींचा आटापिटा शेवटच्या क्षणापर्यंत चाललेलाच होता. अनेक मतदारसंघांत उमेदवारांनी आपापल्या मतदाराला सहलीस पाठविले होते. सहलीवर पाठविण्यापूर्वी ‘अर्थ’पूर्ण आश्वासनांची पूर्तता मतदारांना मिळाली. सहलीस गेलेले मतदार मंगळवारी सकाळी आपापल्या तालुक्यांच्या ठिकाणी मतदानासाठी तहसील कार्यालयात पोहोचले. या वेळी उमेदवाराकडून मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी लाखोंची उड्डाणे उडविण्यात आली. काही मतदारसंघांत मतदाराचा भाव एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. मर्यादित मतदार संख्येमुळे उमेदवारांना एकेका मतासाठी मतदाराचे उंबरठे झिजवावे लागले.
परभणी तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्रे होती. सकाळच्या वेळी मतदारांची गर्दी कमी होती. दुपारच्या सुमारास हळूहळू मतदारांची रांग लागली. मतदारांना तहसीलपर्यंत आणण्यासाठी उमेदवारांनी चारचाकी वाहनांची व्यवस्था केली होती. पणन प्रक्रिया मतदारसंघात  १३ ते १४ मतदार ताफ्यानिशी दुपारी दोनच्या सुमारास तहसील कार्यालयात पोहोचले. या ताफ्यात बँक बचाव पॅनेलचे प्रमुख सुरेश देशमुख, कांतराव देशमुख आदींचा सहभाग होता. सकाळपासूनच परभणीच्या मतदान केंद्रावर सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख, स्वराजसिंह परिहार, विजय जामकर, संतोष बोबडे, श्रीधर देशमुख हजर होते. सायंकाळी पाचपर्यंत मतदान प्रक्रिया हळूहळू चालू होती. मतदान शांततेत पार पडले.
९८.६७ टक्के मतदान
बँकेच्या १५ जागांसाठी ९८.६७ टक्के मतदान झाले. एक हजार ५८९ पकी १ हजार ५६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पालम, सेलू, जिंतूर, औंढा नागनाथ, सेनगाव या ठिकाणी १०० टक्के मतदान झाले. पणन व प्रक्रिया मतदारसंघांत सर्व ६६ मतदारांनी मतदान केले. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघात गंगाखेडमधून ४४ पकी ४३, सोनपेठमध्ये ३६ पकी ३४, मानवतमध्ये ६४ पकी ६३, िहगोली ९३ पकी ८६, कळमनुरीत ८० पकी ७९ मतदारांनी मतदान केले. बिगरशेती मतदारसंघात परभणीत १७८ पकी १७४, पूर्णेत ५६ पकी ५५, गंगाखेडमध्ये ५६ पकी ५५, पाथरी ३७ पकी ३६, िहगोली ३३ पकी ३२ व वसमतमध्ये ३६ पकी ३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात ६७०पकी ६६१ मतदान झाले.
बीड जिल्हा बँकेत सरासरी
९५ टक्के विक्रमी मतदान
वार्ताहर, बीड
जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकत्र आल्याने मंगळवारी ११ मतदान केंद्रांवर दोन्ही पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी एका मंडपात बसून मतदान करवून घेतले. परिणामी, सरासरी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवर दुपापर्यंतच शंभर टक्के मतदानाचा विक्रम झाला. राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांचे पॅनेल मदानात असले, तरी दिग्गज नेते एकत्र आल्याने मतदान केंद्रांवर विरोधकच राहिले नाहीत. परिणामी सहमतीने शांततेत मतदान पार पडले.
बीड जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी मंगळवारी ११ तालुक्यांच्या ठिकाणी मतदान झाले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ लोकविकास पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांच्यासह काँग्रेसचेही नेते सामील झाल्याने निवडणूक एकतर्फीच होणार, हे निश्चित होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी बँक बचाव पॅनेल मदानात उतरविले असले, तरी निवडणुकीत फारसा रंग आला नाही.
मंगळवारी सर्वत्रच मतदान केंद्रांबाहेर भाजप व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते-कार्यकत्रे एकाच शामियान्यात बसून लोकविकास पॅनेलच्या छत्रीला मतदान करवून घेत होते. राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनेलच्या शामियान्यात मात्र फारसा उत्साह दिसून आला नाही. पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत, तर अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी गेवराईत मतदानाचा हक्क बजावला. १४ जागांसाठी ३७ उमेदवार िरगणात असून ७ मे रोजी जिल्हा मजूर संघात मतमोजणी होणार आहे.