हतबल मातेचे जिल्हा बँकेकडे गाऱ्हाणे

आठ दिवसांनी मुलीचे लग्न आहे. जिल्हा बँकेतील ठेवीची मुदत संपून वर्ष झाले आहे. लग्नासाठी आता पसे मिळाले नाहीत तर नातेसंबंध मोडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काबाडकष्ट करून मुलीच्या नावे जिल्हा बँकेत पैसे ठेवणाऱ्या सुनीता जाधव सध्या कमालीच्या हतबल झाल्या आहेत. दररोज ५० किलोमीटर प्रवास करून स्वत:ची रक्कम मिळावी आणि मुलीचे लग्न निर्वघ्नि पार पडावे यासाठी त्या बँक अधिकाऱ्यांपुढे अक्षरश: लोटांगण घालत आहेत. पण या बँकेतून निराशेपलिकडे त्यांच्या हाती काहीही येत नाही. उस्मानाबाद जिल्हा बँकेतील ही शोकांतिका आहे.

सुनीता जाधव यांच्याप्रमाणेच मोलमजुरी करून जिल्हा बँकेचे ठेवीदार असलेल्या सामान्य शेतकरी आणि शेतमजुरांवर सध्या आíथक संकटांचा डोंगर कोसळला आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवाशी असलेल्या सुनीता जाधव यांच्या मुलीचे लग्न अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपले आहे. बँकेतील खात्यावर असलेल्या तीस हजार रुपयांच्या ठेवीच्या भरवशावर त्यांनी मुलीचे लग्न काढले. सात मे रोजी मुलीच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. मात्र, अजून सुनीता जाधव यांच्या हातात स्वत:च्या हक्काचे पसे पडलेले नाहीत.

जाधव यांच्याप्रमाणेच केसरजवळगा येथील प्रमोद कांबळे यांची कैफियत देखील संतापजनक आहे. सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी प-प गोळा करून त्यांनी जिल्हा बँकेच्या खात्यात ७० हजार रुपयांची ठेव ठेवली होती. सात मे रोजी बहिणीचे लग्न आहे आणि जिल्हा बँकेतून चलन तुटवडय़ाची सबब पुढे करून पसे मिळणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. जोवर पसे मिळणार नाहीत तोवर घरी कसे जाऊ, हा प्रश्न त्यांना आतल्या आत खात आहे. तब्बल १३० किलोमीटरचा प्रवास करून आलेले कांबळे जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत सध्या ठाण मांडून बसले आहेत.

जिल्हा बँकेच्या दुर्दशेमुळे अनुसया पांढरे यांच्या वाटय़ाला आलेले दु:ख अत्यंत क्लेशदायक आहे. जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सोसायटीत सचिव असलेल्या अनुसया पांढरे यांचे पती सुनील पांढरे यांचे वर्षभरापूर्वी अपघाती निधन झाले. नुकसान भरपाईपोटी अनुसया पांढरे यांच्या खात्यात एक लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम जमा झाली. पतीचे निधन होऊन वर्ष लोटले तरी त्यांच्या खात्यावरील रोकड अद्याप त्यांना मिळालेली नाही. महिन्याकाठी एक हजार अथवा दोन हजार याप्रमाणे मागील वर्षभरात त्यांच्या स्वत:च्या हक्काचे केवळ दहा हजार रुपये त्यांना अदा करण्यात आले आहेत. पतीच्या मागे दोन मुलीचे शिक्षण आणि चरितार्थासाठी पांढरे याची ससेहोलपट होत आहे.

एकंदरीत राजकीय वरदहस्त असलेल्या बडय़ा थकबाकीदारांमुळे सामान्य  ठेवीदारांवर आíथक संकटांचा डोंगर कोसळत आहे. अशावेळी जिल्हा बँकेत राष्ट्रवादी आणि भाजपा अशी चमत्कारिक सत्ता भोगणारे कारभारी मात्र मूग गिळून गप्प आहेत, हे विशेष.