जिल्हा बँकेतून खाती काढून घेण्याच्या मागणीने वातावरण तापले

गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटणारे निश्चलीकरणाचे पडसाद शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती बँकावर घातलेले र्निबध लक्षात घेऊन जिल्हा परिषदेची खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडावीत अशी मागणी सभागृहात करण्यात आली, त्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.  सभागृहाचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात चाललेले असताना कॉंग्रेसचे राजेंद्र पाटील यांनी नोटाबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून लगेच कळीचा मुद्दा उपस्थित केला. अनेक जिल्हा बँका अडचणीत आल्या  आहेत. या स्थितीत पुढील धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेचा निधी हा जिल्हा बँकेत असल्याने तो राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्यात यावा अशी मागणी करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांना पगाराची रक्कम मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

शेकापचे सदस्य आ. अस्लम राऊत यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. जिल्हा बँकेचा कारभार सुरळीत चालला असून बँकेला शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा वेळी वातावरण गढूळ करू नका. असा सल्ला राऊत यांनी दिला. त्यावर  जिल्हा बँकेवर कोणताही आरोप नसल्याचे राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.  शेकापचे आस्वाद पाटील यांनी यावर सविस्तर भूमिका मांडल्यानंतर वातावरण शांत झाले. त्यावर  जिल्हा बँकेवर कोणताही आरोप नसल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.   आजची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सदस्यांच्या कार्यकालातील शेवटची असल्याने या सभेला सर्व सदस्य आवर्जून हजर होते. यावेळी जिल्हा परिषदेमार्फत अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे, सभापती चित्रा पाटील, गीता जाधव त्याचबरोबर सर्व सदस्य यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेचे कामकाज कशा प्रकारे चालते याविषयी जिल्ह्य़ातील १५ तालुक्यांतील ६ वीच्या विद्यार्थ्यांना सभागृहात आमंत्रित करण्यात आले होते.

म्हसळा येथील उर्दू शाळेतील दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ८ लाख ६२ हजार ३८७ एवढा निधी खर्ची पडला आहे. ७ लाखांत शाळेची नवीन इमारत उभी रहात असताना दुरुस्तीवर झालेला एवढा मोठा खर्च हा संशयास्पद असून त्याची चौकशी व्हावी. अशी मागणी शामकांत भोकरे यांनी केली. यावर शिक्षणाधिकारी बडे यांनी हे प्रकरण तपासून पाहू असे उत्तर दिले. शिवसेनेचे सदस्य बाळ राऊळ यांनी पाचाड येथील राजमाता जिजाऊ सभागृहासाठी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून घ्यावा, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक सर्वसाधारण सभेला  बोलावण्याविषयी सूचना केल्या.

समायोजनात जिल्ह्य़ातील माध्यमिक शाळांचे शिक्षक अतिरिक्त ठरताहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्याच शाळांतील अनेक पदे रिक्तआहेत. ही बाब लक्षात घेऊन या अतिरिक्त शिक्षकांना या ठिकाणी सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी आस्वााद पाटील यांनी केली.  पनवेल महानगरपालिका होत असल्याने जिल्हा परिषदेचा ४० कोटींचे उत्पन्न कमी होत असल्याने प्रशासनाने आरोग्यविषयक ना हरकत दाखल्यावरची फी वाढवली असून याचा फायदा जिल्हा परिषद महसूल वाढीसाठी होणार असल्याचे अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी सांगितले.

बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मिश्रक पदावर काम करीत असलेले  के. डी. पाटील  हे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णाांवर वैद्यकीय उपचार करीत असून ते रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याची धक्कादायक बाब सभागृहासमोर मांडली.  पोलादपूर तालुक्याकतील पळचील आरोग्य केंद्राच्या नव्या बांधकामावर ४५ लाखांचा खर्च केला असून अजूनही या इमारतीचे उद्घाटन झाले नसल्याची बाब अपर्णा जाधव यांनी निदर्शनास आणून दिली.

याशिवाय इतर महत्त्वाच्या मुद्दय़ांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. प्रमुख सदस्यांनी आपल्या भाषणात गेल्या ५ वर्षांंत अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, अ‍ॅड. नीलिमा पाटील, राष्ट्रवादीच्या प्रतोद वैशाली पाटील, वैजनाथ ठाकूर, महादेव पाटील, डी. बी. पाटील यांनी चच्रेत भाग घेतला. आजच्या सभेत महेंद्र दळवी व राजीव साबळे यांची कमतरता जाणवली.