जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून, भाजपचे सदस्य शनिवारी अज्ञातस्थळी सहलीला रवाना करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असताना रयत विकास आघाडीचा सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसला तरी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयतच्या पािठब्यासाठी इस्लामपुरात ठाण मांडले आहे.

जिल्हा परिषदेच्या ६० जागा असून, यापकी २५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी अद्याप ६ सदस्यांची गरज आहे. रयत विकास आघाडीतील आ. शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत हे भाजपला अनुकूल असले तरी सी. बी. पाटील, खा. राजू शेट्टी यांनी मात्र काँग्रेसला अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सर्वसहमतीने निर्णय घेण्यासाठी नानासाहेब महाडिक, वैभवकाका नायकवडी यांच्यासह आघाडीच्या सर्व नेत्यांची ४ सदस्यांसमवेत बठक बोलावण्यात आली आहे.

शिवसेनेचे ३ सदस्य असून सत्तास्थापनेत महत्त्व आले आहे. मात्र आजअखेर आ. अनिल बाबर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने सेनेबाबत गूढ निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपला या सर्वाची मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून, यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही मदत घेतली जात आहे. काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनीही सांगलीत राहून पािठबा मिळवण्यासाठी मोच्रे बांधणी सुरू केली असून, सत्तेच्या चाव्या कोणाकडे हे समजण्यास सोमवारची प्रतीक्षा करावी लागणार आहे.  दरम्यान, भाजपने एकसंघ असलेल्या २५ सदस्यांना शनिवारी रात्री सहलीला रवाना केले आहे. या सदस्यांचा कोणाशीही संपर्क येणार नाही याची दक्षता घेण्यात आली असून, अखेरच्या क्षणी त्यांना सांगलीत आणले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड २१ मार्च रोजी होणार असून  सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.