परिचरपदाची परीक्षा प्रशासनाकडून रद्द
परभणी जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या ‘परिचर’ या पदासाठीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्यावरून शहरात मोठा गोंधळ निर्माण झाला. दुपारी दोन वाजता ही परीक्षा सुरू होणार होती. तथापि परीक्षा केंद्रावर जो प्रश्नपत्रिकांचा लखोटा आला तो बहुतांश ठिकाणी सीलबंद नसल्याने परीक्षार्थीनी आक्षेप घेतला. त्यानुसार आजची परीक्षा रद्द करण्यात आली. संतप्त परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावरून आधी जिल्हा परिषद व नंतर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठी गर्दी करून रोष व्यक्त केला. संतप्त परीक्षार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. खासदार जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परीक्षार्थ्यांशी या वेळी संवाद साधला. परीक्षार्थीनी काही काळ वाहतूकही रोखल्याने बराच गोंधळ निर्माण झाला.
आज शहरातल्या ४७ परीक्षा केंद्रांवर परिचर या पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी तब्बल ४९२ वर्गखोल्या होत्या, तर ११ हजार ४६६ परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. दुपारी दोन वाजता परीक्षेची वेळ होती. मात्र शहरातल्या अनेक परीक्षा केंद्रांवर उशिराने प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. काही ठिकाणी दहा मिनिटे तर काही ठिकाणी २० मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिका आल्या. जेव्हा प्रश्नपत्रिकांची पाकिटे परीक्षा केंद्रावर आली तेव्हा ‘सील’ उघडण्यापूर्वी परीक्षार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे अपेक्षित होते. एखाद्या ठिकाणी कदाचित नजरचुकीने पाकिटाला सील लावायचे राहिले असणे समजू शकत होते, पण बहुतांश परीक्षा केंद्रावरच्या परीक्षार्थ्यांनी प्रश्नपत्रिकांची पाकिटे खुलीच आल्याच्या तक्रारी केल्या. यावर विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असतानाच या परीक्षेचा पेपर फुटल्याचे वृत्त शहरात वेगाने पसरले. त्याच वेळी ही परीक्षा रद्द झाल्याचे परीक्षा केंद्रावर सांगण्यात आले. शहरातल्या तब्बल ४७ परीक्षा केंद्रांवरून परीक्षार्थ्यांनी आरडाओरडा करतच आधी जिल्हा परिषदेच्या इमारतीकडे धाव घेतली. त्या ठिकाणाहून विद्यार्थी संतप्त घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर परीक्षार्थी दाखल झाल्यानंतर खासदार संजय जाधव हेही या ठिकाणी पोहोचले. या वेळी परीक्षार्थ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. जमावाला शांतता राखण्याचे आवाहन खासदार जाधव यांनी केले. त्यानंतर ही परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी प्रशासनाच्या वतीने जबाबदार कोणीही उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर संतप्त परीक्षार्थ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाचा जोरदार निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी शेवटी पोलिसांनी बळाचा वापर केला.

चौकशी करा- खासदार जाधव

जिल्हा परिषदेच्या परिचर या पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याची विद्यार्थ्यांची तक्रार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार जाधव यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याशी दूरध्वनीवरून केली. आजची परीक्षा रद्द झाली असली तरीही पुढे विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क न घेता ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

नाइलाजाने परीक्षा रद्द

परिचर या पदासाठीची परीक्षा ४७ केंद्रांवर घेण्याचे नियोजन केले होते. प्रत्येक वर्गखोलीसाठी प्रश्नसंचाचे वेगळे पाकीट वेळेवर पाठविणे आवश्यक होते. ही पाकिटे पाठवताना नजरचुकीने काही पाकिटे सीलबंद न होताच पाठविण्यात आली. याला परीक्षार्थीनी आक्षेप घेतला व परीक्षा देण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत पारदर्शकता राहण्यासाठी नाइलाजाने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. परीक्षेची तारीख निश्चित करून येत्या २० अथवा २७ डिसेंबरला शाळा खोल्या उपलब्धतेनुसार ही परीक्षा घेतली जाईल, असे सांगण्यात आले.

गेल्यावर्षी याच महिन्यात
परभणीत ‘परिचर’ या पदाच्या पेपरफुटीचा प्रकार आज घडल्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या आणखी एका पेपरफुटीला उजाळा मिळाला. विशेष म्हणजे गेल्यावर्षी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी असलेले राहुल रंजन महिवाल हे आता परभणीचे जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीच्या निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हेच आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या कृषी विस्तार अधिकारी, तारतंत्री, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी रविवारी २ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका औरंगाबाद येथे आढळल्या होत्या. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिकांची छपाई यवतमाळात झालेली असताना त्या औरंगाबादला कशा गेल्या, या प्रश्नाची चौकशी मधल्या काळात सुरू होती. त्यावेळी शेकडो संतप्त उमेदवारांनी २४ नोव्हेंबर २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला होता.