शिवसेना आणि काँग्रेसला फटका

पालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला दबदबा कायम राखला आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपकी सर्वाधिक २६ जागांवर वर्चस्व मिळवित राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या जवळ गेली आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि शिवसेनेला मात्र मागील निवडणुकीतील आकडाही गाठता आलेला नाही. पूर्वी केवळ दोन सदस्य असलेल्या भाजपाने आता चार सदस्य संख्येवर उडी घेतली आहे. जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपकी चार पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे. मागील कार्यकाळात विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीसाठी यंदा मतदारांनी सत्तेचे दार उघडे करून दिले आहे.

राष्ट्रवादीविरुध्द सर्वपक्षीय पदाधिकारी, असे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाचे स्वरूप आहे. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीची सर्व धुरा त्यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर सर्वपक्षीयांनी एकत्रित येत मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार पाटील यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून पूर्ण ताकदीनिशी रोखले. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्रित आघाडी करून जिल्हा परिषदेवर सत्ता गाजवली. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला आपल्या यशात सातत्य राखता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने या तिन्ही पक्षांना एकांगी लढत देवून सर्वाधिक जागा निवडून आणण्यात यश मिळविले आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेसचे २०, शिवसेनेचे १४ आणि भाजपाचे दोन सदस्य निवडून आले होते. यंदा काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. २० सदस्य संख्येवरून काँग्रेस थेट १३ सदस्य संख्येवर येवून आदळली आहे. शिवसेनेला देखील या निवडणुकीत आपटी खावी लागली असून त्यांच्याही तीन जागा कमी झाल्या आहेत. भाजपाने दोन अंकी आकडा गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र मतदारांनी त्यांना केवळ चार सदस्य संख्येवरच रोखून धरले. मागील निवडणुकीत अठरा सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीने तब्बल आठ जागा शिवसेना आणि काँग्रेसच्या तोंडातून हिसकावून घेतल्या आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील बारा जिल्हा परिषद गटांपकी तब्बल नऊ ठिकाणी राष्ट्रवादीने विजयश्री खेचून आणली आहे. उर्वरित तीन जागांपकी दोन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी भाजपाला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तुळजापूर तालुक्यात देखील राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. नऊ जागांपकी पाच जागांवर काँग्रेस तर चार ठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाली आहे. उमरगा तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटांपकी काँग्रेस पाच, भाजप दोन आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले आहे. लोहारा तालुक्यातील चार जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक तर काँग्रेस दोन ठिकाणी यशस्वी झाली आहे. भूम तालुक्यात पाच गटांपकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी तर दोन ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले आहे. वाशी तालुक्यातील तीन गटात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. कळंब तालुक्यात एकूण आठ जिल्हा परिषद गट आहेत. यापकी तब्बल पाच ठिकाणी आपले निर्वविाद वर्चस्व सिध्द केले आहे. शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. परंडय़ातील पाच जिल्हा परिषद गटांपकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन जागांवर तर भाजपाने एका ठिकाणी यश मिळविले आहे.

वारसदारांची चलती

मतदारांनी मातब्बर नेत्यांच्या वारसदारांना काही ठिकाणी डावलले असले तरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात काही वारसदारांना मात्र संधी मिळाली आहे. शिवाजी चालुक्य यांचे पुतणे अभय चालुक्य माजीमंत्री आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील, माजी आमदार भाऊसाहेब बिराजदार यांचे पुतणे सुरेश बिराजदार, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मतदारांनी सकारात्मक कौल दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांचा प्रवेश सुकर झाला आहे.

वारसदारांचे पानिपत

कार्यकर्त्यांची निवडणूक अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या आखाडय़ात यंदा अनेक मातब्बरांनी आपल्या वारसदारांना पुढे केले होते. सर्वसामान्य मतदारांनी लढवय्या पदाधिकाऱ्यांना पसंती क्रमांक देत वारसदारांचे या निवडणुकीत पानिपत केले आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड आणि शिवाजी चालुक्य यांचे पुत्र संताजी चालुक्य या दोघांना काँग्रेसचे प्रकाश आष्टे यांनी धूळ चारली. राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकत्रे कैलास पाटील यांना डावलून सांजा गटातून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे मेहुणे तथा अजित पवार यांचे साडू जीवन गोरे यांचे पुत्र आदित्य गोरे यांना प्राधान्य देण्यात आले होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आपले जावई आदित्य गोरे यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड आटापिटा केला. मात्र राष्ट्रवादीतून ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या सामान्य कार्यकर्ता असलेल्या कैलास पाटील यांना मतदारांनी मोठय़ा मताधिक्याने निवडून दिले आहे. माजी आमदार सि. ना. आलुरे गुरूजी यांचे पुतणे दीपक आलुरे यांचा पराभव आमदार मधुकर चव्हाण यांचे पुत्र बाबुराव चव्हाण यांनी केला आहे.