लातूर जिल्हा परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत ५८ पकी ३६ जागा भाजपाला

उस्मानाबादमधून विभाजित झाल्यानंतर लातूर जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक १९९२ मध्ये झाली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. ९ वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद लातूर जिल्ह्य़ातील विलासराव देशमुखांकडे असल्याने या जिल्ह्य़ात अन्य कोणताच पक्ष विजयी होणार नाही, अशी खात्री दिल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्य़ात ५८ पैकी ३६ जागांवर यश मिळवत भाजपने स्वत:चा झेंडा लातूरच्या राजकारणात रोवला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने काँग्रेसच्या गडावर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले.  ५ जागा राष्ट्रवादीला, १ जागा शिवसेनेला तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

निलंगा विधानसभा मतदारसंघातील १४ जिल्हा परिषदेच्या जागांपकी १३ जागा भाजपाने जिंकून निलंगा मतदारसंघ ताकदीने पालकमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. निलंगा हा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघ आहे. केवळ निलंगाच नाही तर चाकूर तालुक्यातील पाचही जागा भाजपाने जिंकून तालुका ‘काँग्रेसमुक्त’ केला. अहमदपूर तालुक्यातील सहापकी चार जागा भाजपाने जिंकल्या. राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या व या तालुक्यातून काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. या अनुषंगाने लातूरचे आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले,  ‘पराभव आपण स्वीकारत असून या पराभवाची कारणमीमांसा केली जाईल व आम्ही नेमके कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करू.’

उदगीर तालुक्यातील ७ जागांपकी भाजपाला ५ जागांवर विजय मिळाला. एक जागा राष्ट्रवादी व एक जागा काँग्रेसला मिळाली. काँग्रेसचा गड मानला जात असलेल्या रेणापूर तालुक्यात ४ जागांपकी तब्बल ३ जागा भाजपाला मिळाल्या व केवळ एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. आश्चर्याची बाब म्हणजे या तालुक्यातील पंचायत समितीतील सर्व ८ जागा भाजपाने जिंकल्या व हा तालुकाही काँग्रेसमुक्त केला. २५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे आमदार दिलीपराव देशमुख पराभवाविषयी बोलताना म्हणाले, की जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून आम्ही प्रचाराची यंत्रणा चांगली राबवली होती मात्र आरक्षित जागांवरील मतदारांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो असल्याची कबुली आ. दिलीपराव देशमुख यांनी दिली. सत्तेच्या वेळी जनता आमच्या सोबत होती, आता सत्ता बदलली असल्यामुळे मतदारांनी सत्तेसोबत जाण्याचे ठरवलेले दिसते. आगामी काळात आम्हाला पुन्हा मेहनत करावी लागेल, असेही ते पुढे म्हणाले.  निलंगा पंचायत समितीतील १८ जागांपकी १६ जागा भाजपाला तर २ जागा काँग्रेसला मिळाल्या. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २ जागा भाजपाला व पंचायत समितीच्या ४ जागांपकी ३ जागा भाजपाला व १ जागा काँग्रेसला मिळाली. देवणी तालुक्यातील ६ जागांपकी सहाही जागा भाजपाने जिंकून हा तालुकाही काँग्रेसमुक्त केला.अहमदपूर पंचायत समितीतील १२ पकी १० जागा भाजपाने जिंकल्या. एक जागा राष्ट्रवादीला तर एक जागा शिवसेनेला मिळाली. याही तालुक्यातून मतदारांनी काँग्रेसला मुक्त केले. उदगीर पंचायत समितीत १४ पकी ९ जागा भाजपाला मिळाल्या. जळकोट तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गटांपकी २ जागा काँग्रेसला तर १ जागा अपक्षाला मिळाली. पंचायत समितीतील ३ जागा काँग्रेस, १ जागा राष्ट्रवादी, १ जागा भाजपा तर १ जागा अपक्षाला मिळाली. या पंचायत समितीवर काँग्रेस आपले वर्चस्व टिकवेल. औसा तालुक्यातील ९ जिल्हा परिषद जागांपकी ४ जागा काँग्रेसकडे, ३ जागा भाजपाकडे, एक शिवसेना तर एक राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल राहिले. या तालुक्यातील पंचायत समितीच्या ९ जागा जिंकून काँग्रेसने आपले प्रभुत्व सिद्ध केले. भाजपच्या ५, राष्ट्रवादीच्या २, शिवसेनेला एक तर मनसेलाही एक  जागा मिळाली.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा व माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर यांना या निवडणुकीत भाजपाच्या  प्रीती िशदे या नवख्या उमेदवाराकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख हे भादा जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती कल्याण पाटील यांच्या पत्नी शीतल पाटील या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजयी झाल्या. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोिवद केंद्रे यांचे चिरंजीव राहुल केंद्रे हे या निवडणुकीत विजयी झाले. भाजपाचे जिल्हा परिषदेतील गटनेते रामचंद्र तिरुके यांना या निवडणुकीत दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली होती. वलांडी जिल्हा परिषद गटातून ते साडेतीन हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन जिल्हा परिषदेवर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

‘बहुमताने सत्ता दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे लोकहिताची कामे करत आहेत. गतवर्षी लातूरकरांना अडचणीत साथ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात द्यायचे आवाहन केले होते. त्याला लातूरकरांनी प्रतिसाद दिला आहे.’

संभाजी पाटील निलंगेकर

धीरज देशमुख जिंकले, काँग्रेस हरली!

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून धीरज देशमुख यांचे नाव जाहीर केले. त्यांच्याभोवती प्रचाराचा केंद्रबिंदू होता. काँग्रेसचे सर्व नेते धीरज देशमुख कसे निवडून येतील यासाठी विशेष लक्ष देत होते. त्यांचे लक्ष एकाच गटात केंद्रित झाल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने पाय पसरायला सुरुवात केली. धीरज देशमुख जिंकले, काँग्रेस हरली.