राष्ट्रवादीची घसरण : भाजपचा विजयरथ १३ जागांवर थांबला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या ‘होमपीच’वरील नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाचे अव्वल स्थान कायम राखण्यात यश प्राप्त केले. मराठवाडय़ात अन्य जिल्हा परिषदांत काँग्रेसची पिछेहाट झालेली असताना, नांदेड जिल्ह्याने पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला.

नांदेड जि. प.च्या ६३ आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या १२६ जागांसाठी गेल्या १६ तारखेला झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू झाली. पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला; पण या पक्षाने ‘३२ प्लस’चे उद्दिष्ट बाळगलेले असताना त्यांचा ‘विजयरथ’ १३ जागांवर थांबला. नांदेड जि. प. त २८ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या स्थानावर आहे.

या पक्षाचे काही प्रमुख उमेदवार पराभूत झाल्याने काँग्रेसला बहुमत गाठता आले नाही. असे असले, तरी आधीच्या प्रथेप्रमाणे ‘राष्ट्रवादी काँग्रेस’सोबत आघाडी करून सत्ता स्थापता येईल, असे पक्षाचे आमदार डी. पी. सावंत व अमरनाथ राजूरकर यांनी सायंकाळी वार्ताहर बठकीत सांगितले. या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ची १८ वरून १० वर घसरण झाली तर शिवसेना ११ वरून १० वर थांबली.

काँग्रेसच्या प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये विद्यमान सभापती संजय बेळगे (लोहगाव गट), माजी सभापती शांताबाई निवृत्तीराव जवळगावकर (दुधड गट), सुशीलाबाई पाटील बेटमोगरेकर (चांडोळा गट), मंगाराणी अंबुलगेकर (बाऱ्हाळी), यांचा समावेश आहे. तर अ‍ॅड. विशाखा पाटील टाकळीकर, दीपाली होटाळकर, बालाजी पांडागळे आदी प्रमुख उमेदवार पराभूत झाले. आमदार अमिता चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील २ जागा काँग्रेसने गमविल्या; पण नांदेड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील पाचही जागा निवडून आणत आमदार डी. पी. सावंत यांनी आपली राजकीय प्रगल्भता सिद्ध केली.

यंदाच्या निवडणुकीत राजकीय घराण्यांतील प्रतिनिधी निवडणूक िरगणात उतरले होते. ‘सुनबाई जोरात’च्या प्रयोगात डॉ. मीनल खतगावकर, पुनम राजेश पवार, संध्या धोंडगे, स्वाती गोजेगावकर (भाजप), मधुमती राजेश कुंटूरकर (राष्ट्रवादी), भाग्यश्री साबणे (एकलारा) यांनी आपापल्या गटांमध्ये विजय संपादन केला. शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कन्या प्रणिता देवरे व मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर या दोघांनाही निवडून आणले; पण त्यांच्या ‘कुटुंब कल्याण’ प्रयोगात पुतण्या सचिन पाटील चिखलीकर यांना मतदारांनी नाकारले.

नांदेड तालुक्यातील िलबगाव या राष्ट्रवादीच्या गडाला काँग्रेसने िखडार पाडले. किनवट – माहूर भागात ‘राष्ट्रवादी’च्या आमदार प्रदीप नाईक यांनी ५ जागा आणत पक्षाची घसरण रोखली. उमरी तालुक्यात याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी आपले वर्चस्व कायम राखले. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांना जबर धक्का बसला. भाजपचे आमदार तुषार राठोड यांना मुखेडमध्ये प्रभाव राखता आला नाही. तीच गत शिवसेना आमदार सुभाष साबणे यांची झाली.

माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार, वैशालीताई चव्हाण, जनाबाई डुडुळे, माजी सदस्य ज्योतिबा खराटे तसेच काँग्रेसच्या विद्यमान जि. प. सदस्य वर्षां भोसीकर, युवक काँग्रेसचे नेते केदार पाटील साळुंके हे प्रमुख उमेदवार पराभूत झाले. भाजपाचे विद्यमान सदस्य लक्ष्मण ठक्करवाड तसेच भाजपत गेलेले माजी सभापती व्यंकटराव गोजेगावकर (मरखेल गट) यांच्यासह, शिवसेनेचे बबन बारसे (येळेगाव गट), पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव बळेगावकर, माधवराव मिसाळे हेही आपापल्या गट – गणांत विजयी झाले.

चार प्रमुख पक्षांनी ६१ जागा आपल्या खाती जमा केल्या आहेत. दशरथ लोहबंदे (रासप) आणि शोभा गोमारे (कुरुळा) हे दोन अन्य यशस्वी उमेदवार आहेत. भाजप नेते भास्करराव खतगावकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावत सुनेला निवडून आणले; पण पक्षाला मोठे यश मिळवून देण्यात ते अयशस्वी ठरले. निकालावर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया कळली नाही; पण काँग्रेसने गुरुवारी दुपारीच विजयोत्सव साजरा केला.