तब्बल ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीगोंद्यातील मंडलाधिकारी व कामगार तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्य़ात गेल्या तीन महिन्यांत, त्यांच्याच महसूल विभागाचे ६ अधिकारी व कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत हे विशेष आहे
श्रीगोंद्याचा मंडलाधिकारी दत्तात्रेय नाना साळुंके व कामगार तलाठी स्वप्नील प्रदीप होळकर या दोघांना तहसील कार्यालयातीलच संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास पकडण्यात आले. साळुंके हा खरा अव्वल कारकून परंतु त्याच्याकडे भानगावच्या मंडलाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार होता. भानगाव येथील तक्रारदाराची वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर अवैध मातीचा साठा केला, त्याची रॉयल्टी जमा केली नाही, या कारणावरून, शुक्रवारी पंचनामा करण्यात आला. त्यानुसार कारवाई करू नये यासाठी साळुंके व होळकर या दोघांनी त्याच्याकडे ८० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली, त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र माळी, विजय मुर्तडक, हवालदार कल्याण गाडे, वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, प्रमोद जरे, राजेंद्र सावंत अंबादास हुलगे आदींनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले.
गेल्या तीन महिन्यांत लाचेच्या जाळ्यात महसूल विभागाचे, नगर व संगमनेरमधील दोघे नायब तहसीलदार, श्रीगोंदे, नगर व घोडेगाव येथील मंडलाधिकारी तसेच एक तलाठी अडकले आहेत.
 डायल १०६४
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील कार्यालयात आता टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे, १०६४ असा त्याचा क्रमांक आहे. तक्रारदारांना या क्रमांकावरही तक्रार नोंदवता येईल व माहिती मिळेल.