प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसन योजनेखाली मंजूर झालेल्या जागेचा ताबा मिळवून देण्यासाठी ३५ हजारांची लाच मागणा-या पंढरपुरातील मंडल अधिकारी नानासाहेब चन्नप्पा कोळी यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपतीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदाराच्या वडिलांना मंगळवेढा येथे प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसनाखाली जमीन मंजूर झाली आहे. या जागेचा ताबा मिळण्यासाठी स्थानिक तलाठय़ाला पंढरपूरच्या पुनर्वसन कार्यालयातील मंडल अधिका-याकडून संमतिपत्र देणे बंधनकारक होते. त्यासाठी तक्रारदाने मंडल अधिकारी कोळी यांच्याकडे वारंवार संपर्क साधून कामाची पूर्तता करण्याची विनंती केली असता त्याने या कामासाठी ३५ हजारांची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, असेही त्याने बजावले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार चौकशी होऊन मंडल अधिकारी कोळी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.