वसा
मनुष्याचे आजचे जीवन गुंतागुंतीचे बनले आहे. ही गुंतागुंत सोडविताना होणाऱ्या दमणुकीतून मनुष्याला अनेक व्याधींनी ग्रासले. शारीरिक आणि मानसिक व्याधींचा यामध्ये समावेश करता येईल. शारिरीक आणि मानसिक व्याधींवर अधिक चांगल्या प्रकारे मात करता यावी यासाठी विज्ञान क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात नवनवे शोध लावण्यात आले. मात्र तरीही देशातील मोठा समाज प्राथमिक वैद्यकीय गरजांपासून आजही वंचित आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती हे याचे कारण आहे. ‘वसा’ या दिवाळी अंकात आरोग्य क्षेत्रासमोरील
आजचे प्रश्न, काही पेच यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. डॉ. अनंत फडके यांचा
जनआरोग्य चळवळीतील माझी वाटचाल हा लेख वाचनीय आहे. स्त्री कथा, कथांच्या माध्यमातून आरोग्यविषयक विविध विषयांना स्पर्श करण्यात आला आहे.
संपादक : प्रभाकर नारकर
किंमत : १०० रुपये.
****
सृजनसेतू
भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ सन्मान प्राप्त लेखक एस. एल. भैरप्पा (कन्नड), रेहमान राही (जम्मू-काश्मीर) आणि प्रतिभा राय (ओडिसा) या अन्यभाषक प्रतिभावंतांशी साधलेला संवाद हा या अंकाचा विशेष भाग आहे. रेहमान राही आणि प्रतिभा राय यांची मुलाखत जयश्री बोकील यांनी घेतली आहे. यंदाचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावरचा चंद्रकांत पाटील यांनी ३० वर्षांपूर्वी लिहिलेला लेख आवर्जून पुनर्मुद्रित केला आहे. महाबळेश्वर सैल, सानिया, योगिनी वेंगुर्लेकर व संतोष शिंत्रे या लेखकांच्या सरस कथांनी कथाविभाग वाचनीय बनला आहे. कोकणी-मराठी भाषेचा लहेजा घेऊन आलेली सैल यांची कथा, संथपणे उलगडत जाणारी सानिया यांची दीर्घकथा, शिंत्रे यांची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कथा तर वेंगुर्लेकरांची समकालीन वास्तवाचे दर्शन घडवत अंतर्मुख करणारी कथा यांनी हा विभाग लक्षणीय बनला आहे. डॉ. प्रमोद पाटील यांनी माळढोक पक्ष्याची सुरस कहाणी रेखाटनांसह कथन केली आहे. चित्रपट, चित्र, कविता अशा विविध विभागांमुळे हा अंक परिपूर्ण ठरला आहे.
संपादक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
किंमत : १५० रुपये.
****
उल्हास प्रभात
साप्ताहिक ‘उल्हास प्रभात’च्या २१व्या दीपावली विशेषांकात विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश असून या अंकात कमळ आणि कमळाचे मनुष्याच्या जीवनासाठी होणारे विविध प्रकारच्या खाण्यापासून औषधांपर्यंतचे उपयोग ‘शिल्पकार कमळाच्या शेतीचा’ या कव्हर स्टोरी लेखात वाचायला मिळते.
संपादक : गुरुनाथ बनोटे
किंमत : ७० रुपये.