गरीब व अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकत त्यांच्या शिक्षणाची सोय करणाऱ्या वरोराच्या ज्ञानदा वसतिगृहाने शैक्षणिक वर्तुळात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आजवर एक हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करून त्यांना संस्कारक्षम करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ज्ञानदाला आता कार्यविस्ताराचे वेध लागले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक मधुकर उपलेंचवार यांनी १९७१मध्ये विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानदाची स्थापना केली. शिक्षित तरुण हा संस्कारक्षम असलाच पाहिजे, असे ध्येय बाळगून सुरू झालेल्या ज्ञानदामधून बाहेर पडलेले एक हजार विद्यार्थी आज देशविदेशात उच्चपदावर आहेत. सनदी अधिकारी, वकील, अभियंते, डॉक्टर झालेले हे विद्यार्थी या संस्थेला दर वर्षी लाखोंची देणगी देतात. त्यातून नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होते. कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ देणगीदारांच्या बळावर ‘ज्ञानदा’सारखे सकारात्मक ऊर्जा देणारे केंद्र निर्माण करणाऱ्या उपलेंचवार सरांनी आता या संस्थेत स्पर्धा परीक्षांसाठी दीपशिखा व संगणक प्रशिक्षण केंद्र, असे उपक्रम परिसरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. दर वर्षी दोनशे विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या ज्ञानदात या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी दर वर्षी १० लाख रुपये खर्च करण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे यशस्वीपणे राबवला जात आहे. या संस्थेला माजी विद्यार्थ्यांनी हिंगणघाट व नागपूरलाही ज्ञानदासारखेच कृतज्ञता वसतिगृहे सुरू केली असून त्यातूनही अनेक गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञानदाची सध्याची वार्षिक उलाढाल १ कोटी २० लाखांवर जाऊन पोहोचली असून दर वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृहात सामावून घेण्याचा मानस उपलेंचवार सर बोलून दाखवतात. ज्ञानदामुळे शिक्षण घेण्याची अजिबात ऐपत नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे. त्याचे भान राखत आता हे सारे विद्यार्थी या संस्थेच्या हितासाठी तनमनधनाने झटत असल्याचे दुर्मीळ चित्र येथे बघायला मिळते