‘‘लाल दिव्याची गाडी, मिळणाऱ्या सुविधा, सवलती, प्रतिष्ठा यांकडे पाहून किंवा कोणत्याही दबावाला बळी पडून प्रशासकीय सेवेत येऊ नका. प्रशासनात येण्याची मनापासून इच्छा आणि आवड असेल तरच प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न करा,’’ असा सल्ला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिला.
‘लोकसत्ता’ आणि ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ यांच्यातर्फे प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘झेप’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर, आणि उपजिल्हाधिकारी या पदावर असलेले सचिन घागरे यांनी ‘राज्य नागरी सेवांमधील संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमासाठी पुण्याबरोबरच सांगली, वाई, सोलापूर, सातारा, धुळे या ठिकाणांहून विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आले होते. सकाळी ९ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी जागा मिळवण्यासाठी ‘टिळक स्मारक मंदिरा’बाहेर रांगा लावल्या होत्या.
या वेळी डॉ. परदेशी म्हणाले, ‘‘चौकाशा मागे लागतील, राजकारण्यांशी संबंध येतो त्यामुळे प्रशासनातील नोकरी नको, असा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन दिसतो. पगार घेऊन समाजाची सेवा करण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी प्रशासकीय सेवा ही उत्तम संधी आहे. उत्तम आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे माध्यमं आणि राजकारणीही उभे राहतात. पण उत्तम काम करण्यासाठी मुळात आधी कामाची आवड असणे महत्त्वाचे आहे. आपली आवड ओळखून स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. परीक्षेची तयारी करण्यासाठी स्वत:ला सतत अद्ययावत ठेवणे, विषयांची समज वाढवणे गरजेचे आहे. मी तयारी करत होतो तेव्हा इंग्रजीमध्ये ‘द हिंदू’ आणि मराठीमध्ये ‘लोकसत्ता’ ही दोन दैनिके स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवर्जून वाचत होतो. मी वाचकांची पत्रे वाचत असे. एखाद्या विषयावर किती विविध कंगोरे असू शकतात ते पत्रांमधून दिसते. भाषा सुधारण्यासाठी आणि विषयाचे सखोल ज्ञान मिळण्यासाठी वाचन आवश्यकच आहे.’’
‘अधिक चांगले अधिकारी हवेत’
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक चांगले अधिकारी आहेतच, मात्र अधिक चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असल्यामुळे आवर्जून महाराष्ट्र पोलिस दलात या, असे आवाहन करून डॉ. करंदीकर म्हणाल्या, ‘‘कितीही उत्तम क्लासेस लावले आणि अभ्यासच केला नाही तर उपयोग नाही. क्लासची सुविधा असेल, तर ती घेण्यात काहीच चूक नाही. मात्र, त्याबरोबरच स्वत:ही कष्ट केले पाहिजेत. ज्या विषयामध्ये रस आहे, तोच विषय परीक्षेसाठी निवडा. वर्षांनुवर्षे प्रयत्न करूनही स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही, असे अनेक विद्यार्थी आहेत. परीक्षेत यश मिळाले नाही की येणाऱ्या नैराश्याला तोंड देणे हे सर्वात कठीण आहे. त्यामुळेच करिअरचा अजून एखादा पर्याय खुला ठेवा. अजून एखादा पर्याय हातात असेल, तर दडपण कमी होईल आणि साहजिकच आत्मविश्वास वाढायला मदत होईल.’’
‘पाठ करा, परीक्षा द्या’ समीकरण कालबाह्य़
घागरे म्हणाले, ‘‘परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वीच आपण ही परीक्षा का देतोय याबाबत विचारांमध्ये स्पष्टता हवी. भाषा, कौटुंबिक, सामाजिक पाश्र्वभूमी अशा कोणत्याही मुद्दय़ांचा न्यूनगंड बाळगू नका. तयारी करताना उलटय़ा क्रमाने करायची. आधी मुलाखतीची तयारी म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व विकसित करायचे. नंतर मुख्य परीक्षेची तयारी म्हणजे आपल्या आवडीच्या विषयांची सखोल तयारी; हे दोन्ही केल्यानंतर पूर्व परीक्षेची तयारी ही सोपी होते. नव्या परीक्षा पद्धतीमुळे एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षांमध्ये साधम्र्य आहे. पुस्तके पाठ करा आणि परीक्षा द्या, हे समीकरण नव्या पद्धतीमध्ये चालणारे नाही. विषयांचे विश्लेषण करुन त्यावर मते मांडण्याची सवय लावा.
‘बिट्वीन द लाईन्स’ वाचणे गरजेचे
या वेळी ‘द युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी ‘नव्या परीक्षा पद्धती आणि अभ्यास’ याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘एसपीएससी किंवा सीसॅटची परीक्षा देताना ‘बिट्वीन द लाईन्स’ वाचणे आवश्यक आहे. विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असण्याबरोबरच विषयाचे विश्लेषण करण्याची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. यूपीएससीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ‘एथिक्स’ आणि ‘इंटिग्रिटी’ यासाठी दिलेला अभ्यासक्रम हा फक्त संदर्भासाठी आहे. प्रत्यक्षात जो सतत दक्ष असेल, स्वत: विचार करू शकत असेल तोच या परीक्षेत तरून जाईल.’’ उपस्थितांचे स्वागत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले, तर पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी आभार मानले.