सातारा येथील नगर पालिकेच्या हद्दीतील प्रत्येक घरात शाडूच्या मातीचा गणपती बसवता येईल एवढे गणपती आम्ही नक्की तयार करू मात्र प्रत्येकाने शाडूचा, आम्ही केलेला गणपती बसवला पाहिजे, अशी हमी आम्हाला द्यावी असे सांगत केवळ गणपतीचे दिवस आले की पर्यावरण आणि शाडूच्या मातीच्या गणपतीचा विषय काढून काहीच उपयोग होणार नाही तर वर्षभर अगोदर नियोजन करा आम्ही सोबत आहोत असा ठाम विश्वास सातारा येथील प्रसिद्ध कुंभार अशोक कुंभार यांनी व्यक्त केला.
येथे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी मातीचे गणपती बसवण्या संदर्भात बठक घेतली होती. त्यात मातीचा गणपती तयार करावेत तसेच निसर्गाशी मत्रीपूर्ण गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. यावर गणेश मूर्तिकारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कुंभार बोलत होते.
कुंभार पुढे म्हणाले, गणपती महिन्यावर आले असता पर्यावरणाबाबत असणाऱ्या कर्तव्याची जाणीव आपल्याला होते मात्र त्या ऐवजी पुढच्या वर्षीसाठी घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणपतींबद्दल नियोजन व्हायला पाहिजे. मी तसेच माझे वाडवडील १९९५ पर्यंत घरगुती आणि सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या करत होतो. मात्र त्या नंतर बदल होत गेले आणि पीओपी चे प्रस्थ वाढत गेले. आम्हालाही नगरिक म्हणून पर्यावरणासामोर असणारा धोका जाणवतो. मी स्वत या वर्षी ७० मूर्ती शाडूच्या केल्या आहेत. सातारकरांनी ठरवावे, नगर पालिकेने, नगरसेवकांनी ठरवावे आणि दसऱ्यानंतर लगेच या बाबत आम्हाला शाडूच्या मूर्तीची संख्या सांगावी. सातारा शहरात सुमारे २० मूर्तिकार आहेत, तसेच लहान घरगुती गणेश मूर्ती करणारी मंडळी एकत्र आली तर नगरपालिका हद्दीत नक्कीच शाडूच्या गणपतीची स्थापना होऊ शकते; मात्र दोन महिने अगोदर हा विषय मांडून प्रश्न सुटणार नाही असे कुंभार म्हणाले.
साताऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या सुमारे अडीचशे आहे तर नोंदणीकृत मंडळे दीडशे आहेत. या सगळ्यांनी वेळेत गणपती तयार करण्यासंदर्भात माहिती दिली तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचेही गणपती आम्ही तयार करू, असे कुंभार म्हणाले.