मदरशांचे स्वातंत्र्य राज्य सरकारने अबाधित ठेवावे, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना मुस्लीम विरोधी वक्तव्य करु नये, अशी तंबी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर तरी राज्य सरकारने आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असाही टोला आठवले यांनी लगावला.
दलित व अल्पवयीन युवक सनी शरद शिंदे याचा प्रेमप्रकरणातून खून झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शनिवारी आठवले येथे आले होते. मदरशांमधून विज्ञान, गणित व इतर विषय शिकवले जावेत, ही सरकारची भूमिका चांगली असली तरी, मदरशांचे स्वातंत्र्य सरकारने अबाधित ठेवावे तसेच हा निर्णय लागू करण्यापुर्वी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी मदरशांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करावी, असेही आवाहन करताना खा. आठवले यांनी यासाठी आपण दोघांशीही चर्चा करु, असेही सांगितले. मदरशांना देण्यात आलेला शाळांचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, त्यासंदर्भात ते बोलत होते. नव्या सरकारने घोटाळे होऊ नयेत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन करुन आठवले म्हणाले की, राज्य सरकारवर होणारे विविध घोटाळ्यांचे आरोप म्हणजे विरोधकांचा सरकारच्या जाणीवपुर्वक बदनामीचाच प्रयत्न आहे असा आरोप आठवले यांनी केला.